'News 18 लोकमत'चा इम्पॅक्ट: गुलाबी रस्त्याबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

डोंबिवली शहरातील रस्ते रासायनिक कंपन्यांच्या प्रदुषणामुळे गुलाबी झाल्याच्या घटनेला सर्वप्रथम 'News 18 लोकमत'ने वाचा फोडली होती.

डोंबिवली शहरातील रस्ते रासायनिक कंपन्यांच्या प्रदुषणामुळे गुलाबी झाल्याच्या घटनेला सर्वप्रथम 'News 18 लोकमत'ने वाचा फोडली होती.

  • Share this:
ठाणे,6 फेब्रुवारी: डोंबिवली शहरातील रस्ते रासायनिक कंपन्यांच्या प्रदुषणामुळे गुलाबी झाल्याच्या घटनेला सर्वप्रथम 'News 18 लोकमत'ने वाचा फोडली होती. या वृत्ताची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत डोंबिवली शहरातील रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी डोंबिवलीत गुलाबी रस्त्याची पाहणी केली. पाहणीनंतर केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर मग टाळे ठोका, असा सज्जड दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना दिला. डोंबिवलीत पाहणी दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत एमआयडीसी मधील रस्ते, प्रदूषण आणि 27 गावाची वेगळी नगरपालिका करण्यासाठी निवेदन दिले. रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर केडीएमसीमध्ये सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दम भरला. डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबत 3 टप्प्यात कार्यवाही आणि कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासनाच्या यंत्रणा कारखान्यांची तपासणी करून जी सुरक्षा उपकरणे लावण्यास सांगतील ती संबंधित कंपन्यांनी लावावी. ही उपकरणे लावायची की कंपनीला कुलूप लावायचे हा निर्णय कंपनी मालकांनी घ्यावा, असे आदेश आपण दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे घातक केमिकल वाहून जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आणि तिसऱ्या टप्प्यात घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीच्या बाहेर हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपण 15 दिवसांची मुदत दिली असून त्या कंपन्या कोणत्या? त्यांना कुठे जागा द्यायची? कोणाला कुठे हलवायचं याबाबतही आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आम्ही काही वचने दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी महापालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे 100 कोटी रुपये कसे वापरले जातात त्याची तपासणी करून मग पुढील निधी दिला जाणार आहे. इथल्या नागरिकांना आपण एका चांगल्या शहरात राहत असल्याचा अभिमान वाटेल असे शहर निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीतील विकासकामांबाबत महापालिका आयुक्त दालनात तब्बल 2 तास बैठक घेतली. विविध विकासकामांच्या मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केल्याची माहिती समोर येत आहे. रस्ते झाले चक्क गुलाबी.. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीतील रस्ते बुधवारी चक्क गुलाबी झाले होते. डोंबिवली MIDC मध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता तर केमिकलमुळे एमआयडीसीतला रस्ता गुलाबी रंगाचा झाला होता. 'News 18 लोकमत'ने सर्वात आधी या वृत्ताला प्रसिद्धी दिली होती. थेट घटनास्थळावरून या घटनेबाबतची माहिती सर्वांसमोर आणली. या बातमीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दखल घेतली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान डोंबिवलीतील गुलाबी रस्त्याच्या प्रकरणावर चर्चा होत मुख्यमंत्री यांनी आदेश दिले आहेत. नक्की काय आहे प्रकरण? डोंबिवलीतील प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीतील रस्त्यांवर गुलाबी रंग दिसत आहे. हा रंग इतरही काही रस्त्यांवर दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचंही पुढे आलं आहे. या केमिकलमुळे मोठ्या प्रमाणात उग्र दर्प सुटला असून डोळे चुरचुरण्याचे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. डोंबिवलीतल्या या प्रदुषणामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावं लागतंय. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर रसायनांचे कारखाने आहे. हे सर्व कारखाने सुरक्षा आणि पर्यावरणांच्या निकषांचं पालन करत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात या आधी झालेले आहे. कधी कारखान्यात स्फोट होणं, कामगारांचा वायूगळतीने मृत्यू होणं अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये कारखान्यात एवढे प्रचंड स्फोट झाले की त्यामुळे सगळा परिसर हादरुन गेला आहे. याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिक करत असतात मात्र तात्पुरत्या मलमपट्टीपलिकडे फारचं काहीच झालं नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत दखल घेतल्याने काय कारवाई करण्यात येते, हे पाहावं लागेल.
First published: