वैभव सोनावणे, पुणे, 07 मे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यामध्ये म्हसे या गावी काल दुपारी लग्न लागल्यानंतर काही तासातच उष्माघातानं नववधूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयश्री हिरामण मुसळे असे या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. घडलेल्या या घटनेमुळे वधुवरांच्या कुटुंबासह नातेवाईकांना मोठे दुःख होऊन परिसरात शोककळा पसरलीय. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
म्हसे येथील बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामण आणि दिगंबर या दोन मुलांचा विवाह अक्कलकोटमधल्या सख्ख्या मावसबहिणी असलेल्या जयश्री शिवनिगप्पा कळसगोंडा आणि विजयलक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी यांच्याबरोबर थाटामाटात झाला. जयश्री हिचा विवाह हिरामण यांच्यासोबत झाला होता. लग्न समारंभाची सर्व औपचारिकता पूर्ण करून अक्कलकोटवरून आलेले आई वडील आणि नातेवाईक आनंदाने परतीच्या मार्गाने निघाले होते.
परंतु त्या दरम्यानच्या काळात मंडपातच जयश्रीला ताप ,चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. सासरे बबन मुसळे आणि ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरुर या ठिकाणी दवाखान्यांत उपचारासाठी घेऊन गेले. पण जयश्रीची प्राणज्योत उपचारापूर्वीच मालवली होती. नववधूच्या झालेल्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.