औरंगाबाद, 7 ऑगस्ट: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीनं आपल्या दोन जुळ्या मुलांसह आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. पतीच्या मृत्यूचं दु:ख अनावर झाल्यानं अख्ख्या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात आई आणि मुलीचा मृत्यू झाला. मात्र 17 वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. या मुलानं दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे.
समीना रुस्तुम शेख, आयेशा रुस्तुम आणि समीर रुस्तुम शेख हे कुटुंब औरंगाबादमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. या कुटुंबाचे प्रमुख रुस्तुम शेख यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हादरलेल्या अख्ख्या शेख कुटुंबानं सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. स्वामी समर्थ नगरात राहणाऱ्या समीना शेख यांनी मुलगी आयेशा आणि समीर यांच्यासह आत्महत्या केली.
हेही वाचा...मनसे नगरसेवकावर भडकले अजित पवार; म्हणाले, लांबून बोला आमचे 4 मंत्री पॉझिटिव्ह
समीना रुस्तुम आणि आयेशा रुस्तुम यांचा मृत्यू झाला. दोघींचा मृतदेह घरात आढळून आला तर समीर रुस्तुम शेख गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. मात्र, थोडक्यात बचावलेल्या समीरनं पोलिसांना धक्कादायक जबाब दिल्यानं आता या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.
समीरनं दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, समीनानं आपली मुलगी आयेशा हिची आधी गळा दाबून खून केला. नंतर स्वतः गळफास घेतला. गळफास घेण्याआधी समिनाने समीर हाताच्या नस कापून घेण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे समीर नस कापून घेतल्या आणि स्वतः च्या गळ्यावरही ब्लेड मारून घेतलं. तपासाचा भाग असल्याने पोलीस समीरच्या जबाबाबद्दल बोलणं टाळत आहे. मात्र, समीरच्या मावशीनं ही माहिती दिली आहे.
आंतरजातीय प्रेम विवाह...
समीना आणि रुस्तुम शेख यांचा आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. रुस्तुम शेख बांधकाम व्यावसायिक असल्याने आर्थिक परिस्थिती सुद्धा बरी होती. सुरवातीला कुटुंबाची सामूहिक आत्महत्या वाटणारं प्रकरण आईनं मुलीची हत्या केली, या वळणावर आलं आहे.
हेही वाचा...श्रीराम पूजनावरून औरंगाबादेत धरपकड, हे सरकार निजामशाहीचं; भाजप आमदाराचा आरोप
या प्रकरणाला अजून काही वळण असू शकतात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी बचावलेल्या समीरची कसून तपासणी सुरू केली आहे. 4 जुलै रोजी नेमकं त्या घरात काय घडलं याचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांना आहे.