विरेंद्र उत्पात, प्रतिनिधीपंढरपूर, 01 जानेवारी : पंढरपूरच्या विठोबा मंदिरात नवीन वर्षांपासून नवा नियम लागू करण्यात आला आहे. आजपासून मंदिरात मोबाइल बंदी करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आजपासून मदिरामध्ये मोबाईल बंदी लागू केल्यानंतर मंदिर समितीने भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी दर्शन मंडप येथे मोबाइल लॉकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. यावेळी मंदिरात मोबाइल बंदी असल्याने भाविकांनी आपला मोबाइल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मोठी रांग लागली होती.
मंदिर समितीने मंदिरात मोबाइल नेण्यास बंद केला असून मोबाइल लॉकरची देखील सुविधा उपलब्ध करुन दिले असल्याने भाविक या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. विठ्ठल मंदिरात आलेल्या प्रत्येक भाविकाजवळ मोबाइल हा असतोच. मुख्य मंदिरात मोबाइल वापरामुळे सुरक्षेला धोका होऊ शकतो. तसंच मंदिराचे पावित्र राहण्यात यावे, यासाठी मंदिर समितीने आजच्या बैठकीत श्री विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
आज १ जानेवारी २०२० पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलं.
शिर्डीत साई भक्तांची अलोट गर्दी
दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षांच स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून साई भक्तांसह परदेशातील साई भक्तांनीही साई नगरीत हजेरी नववर्षाचे स्वागत केलंय. काल रात्रभर मंदिर उघडे असल्यान रात्री 12 वाजता साईंच दर्शन मिळावं या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याच प्रकर्षान जाणवलं तर माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजन विचारे यांनीही मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास साईसमाधीच दर्शन घेतलं.
साईनगरीत नविन वर्षाच स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. अनेक तास रांगेत उभ राहात भाविकांनी नविन वर्षात सुख - शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकड घातलं. स्वत: आणि कुटुंबाबरोबर देश बांधवांसाठीही भाविकांनी प्रार्थना केली. साईबाबा संस्थानही नवीन वर्षाच स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलंय. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. साईनामाचा गजर करत साईभजनावर तल्लीन होत भक्तांनी नव वर्षाच जल्लोषात स्वागत केलं. संस्थानने आयोजित केलेल्या साई महोत्सवाचाही भाविकांनी आनंद घेतला.
दरम्यान, गर्दीमुळे साई भक्तांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी कळसाचं दर्शन घेतलं. समाधी समोरील बाहेरील भागात तसेच द्वाराकामाई परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांनी मिठाई , चॉकलेट वाटून जल्लोष साजरा केला तर काही भाविकांनी केक कापून नवीन वर्षाचं स्वागत केलं. साईनामाचा गजर करत भाविकांनी मध्यरात्री १२ वा. भजनावर तल्लीन होत मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. मध्यरात्री माजी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार राजन विचारे साईबाबांचे दर्शन घेतलं. विखे पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांनी साई समाधीवर कमळाचं फुल अर्पण केलं यावेळी मोठा हास्यविनोद मंदिरात पहावयास मिळाला. जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देत या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी मिळो आणि शेतक-यांना कर्जमाफी मिळो अशी प्रार्थना साईचरणी केल्याचं विखे पाटील म्हणालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.