Home /News /maharashtra /

10 वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी बीडमध्ये शिक्षणाचा नवा पॅटर्न

10 वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी बीडमध्ये शिक्षणाचा नवा पॅटर्न

शाळा बंद असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून बीडमध्ये शिक्षणाचा अनोखा पॅटर्न करण्यात आला आहे.

    बीड, 13 जून : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळाही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? असा प्रश्न निर्माण होत होता. शाळा बंद असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून बीडमध्ये शिक्षणाचा अनोखा पॅटर्न करण्यात आला आहे. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते व्ही-स्कूल (VSchool) या शैक्षणिक उपक्रमाची नुकतीच सुरुवात झाली. व्ही-स्कूल (VSchool) या उपक्रमाचा बीड जिल्ह्यातील 47 हजार दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. पुणे येथील वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (VOPA) या सामाजिक संस्थेने बीड जिल्ह्यातील काही नामवंत विषयतज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या कामात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली. विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म http://ssc.vopa.in/ येथे मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. "जेव्हा आपलं दैनंदिन शैक्षणिक काम सुरु असतं तेव्हा अशा प्रकारचे वेगळे शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण होत नाही. आपली इच्छा असूनही असे शैक्षणिक उपक्रम मागे राहतात. ती इच्छा पूर्ण न झाल्याने आपल्याला समाधानही मिळत नाही. मात्र, आज कोरोनाच्या संकटाने आपल्याला हे शैक्षणिक स्वप्न सत्यात आणण्यासाठी संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना वोपाच्या माध्यमातून ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आपल्याला यश आले आहे. वोपाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जो उपक्रम सुरु केला, त्यासाठी मी वोपाचे आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांचे आभार मानतो," असं या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले. व्ही-स्कूल उपक्रमाची काय आहेत वैशिष्ट्ये? 1. विद्यार्थ्यांचा स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी प्रयत्न 2. यासाठी कोणत्याही अॅप्लिकेशन, नोंदणी इत्यादी गोष्टींची गरज नाही. कोणत्याही मोबाईलवर याची उपलब्धता होते. 3. कमीत कमी इंटरनेट स्पीडवर देखील हा प्लॅटफॉर्म चालेल. 4. यात फक्त व्हिडीओ नाही, तर टेक्स्ट, अॅनिमेटेड फोटोजचा वापर. 5. मोबाईलचा उद्देश केवळ शिक्षण पोहचण्यासाठी केला आहे. मात्र, खरं शिक्षण मोबाईलच्या बाहेर वही, पुस्तक, पेन आणि परिसर यांचा वापर व्हावा यावर भर दिला आहे. 6. प्रश्नपत्रिका आणि सराव दिले आहेत. 7. शाळा आणि स्थानिक शिक्षकांची यात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. यात वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घेण्यास सांगितले आहे आणि शिक्षकांनाही यात मदतीबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. 8. विद्यार्थ्यांना कोठेही क्लिक करावं लागत नाही किंवा इतर पेजवर जावं लागत नाही. त्यामुळे कमीत कमी इंटरनेट आणि विद्यार्थ्यांचं अधिकाधिक लक्ष वेधून घेण्यास मदत होते. 9. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने विद्यार्थी खरंच अभ्यास करतात की नाही आणि शिक्षक खरंच मदत करतात की नाही यावर तांत्रिकदृष्ट्या देखरेख करण्याची व्यवस्था आहे. याचा उपयोग करुन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कामात अधिक पारदर्शकता आणता येणार आहे. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींवर देखील मदत केली जाणार आहे. 10. यात विद्यार्थ्यांना देखील आपली मतं नोंदवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातून शिक्षकांच्या कामाचं आणि विद्यार्थ्यांच्या सहभाग आणि आकलनाचं मुल्यमापन करता येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रशासनाच्या दीक्षा अॅपमधील सर्व शैक्षणिक व्हिडीओचा देखील येथे खुबीने वापर केला आहे. म्हणजेच शासन निर्देशित ऑनलाइन शिक्षणाला स्पर्धा न करता पूरक अशीच व्यवस्था केली आहे. "सामाजिक व शैक्षणिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी हा प्लॅटफॉर्म" या उपक्रमाविषयी बोलताना हा उपक्रम उभा करणाऱ्या वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, "“बाजारात उपलब्ध असलेले महागडे ऑनलाइन शिक्षणाचे अॅप्स समाजातील सामान्य पालक आपल्या पाल्यांसाठी घेऊ शकत नाहीत. परिणामी गुणवत्तापूर्ण आधुनिक शैक्षणिक साधने व ज्ञान एका विशिष्ट वर्गापूरतेच सीमित राहते. पर्यायाने भविष्यात सामान्य घरातील विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये पिछाडीवर राहण्याची शक्यता वाढते. सामाजिक व शैक्षणिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म व व्यवस्था विकसित केली आहे." "या प्रकल्पात शाळा व शिक्षकांचे स्थान व महत्व अबाधित आहे. शासनाने या पद्धतीने अवलंब केल्यास कमीत कमी आर्थिक साधनांमध्ये आपण गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षणाचा हक्क समाजातील खूप मोठ्या वर्गाला मिळवून देऊ शकू. स्थानिक तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने केवळ 9 लाख रुपयांच्या वार्षिक बजेटमध्ये आम्ही बीड जिल्ह्यातील 47,000 विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली आहे. हे बजेट समाजातील दानशूर व शिक्षणाचे महत्व वाटणाऱ्या लोकांच्या योगदानातून उभे करायचे आहे. त्यात मदतीसाठी आम्ही प्रशासन आणि समाजातील दानशुरांना आवाहन करतो,” असंही प्रफुल्ल शशिकांत म्हणाले. VSchool प्लॅटफॉर्मची ठळक वैशिष्ट्ये: जिल्ह्यातील 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध शाळा व शिक्षक यांना यात सक्रीय रोल आहे, त्यांना बाजूला सारत नाही सर्वांसाठी एकच कंटेंट नसावा, भौगोलिक भागानुसार वेगळी निर्मिती शक्य बाजारातील महागडे अॅप नाकारून, सर्व शिक्षक- शाळा यांनी एकत्र येऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी ह्याची निर्मिती (सहकार तत्त्वावर राबवणे शक्य) लॉकडाऊन संपल्यानंतर देखील विद्यार्थी आणि शिक्षकांना उपलब्ध स्क्रीन टाईम कमी राहील याकडे विशेष लक्ष स्क्रीन च्या बाहेर घेऊन जाणाऱ्या अनेक गृहपाठ व कृतींचा समावेश वापरायला एकदम सोप्पा, संपूर्ण धडा एकाच पेजवर, कॉम्प्लेक्स रचना नाही इंस्टॉलेशन किंवा लॉगीन करण्याची गरज नाही फक्त व्हिडीओचा भडीमार नाही, त्यासोबत सूचना, गृहपाठ, इमेज, gif इमेज, ऑनलाईन परीक्षा, फीडबॅक यांचा कल्पकतेने वापर शिक्षकांच्या प्रतिक्रिया या शैक्षणिक उपक्रमाविषयी बोलताना आंबेजोगाईचे इंग्रजीचे वरिष्ठ शिक्षक श्रीधर नगरगोजे म्हणाले, “आम्ही बालभारती सोबत पुस्तकनिर्मितीचे काम करताना नेहमी तंत्रज्ञानाचा न्याय्य (योग्य) वापर हि संज्ञा वापरायचो, पण हा प्लॅटफॉर्म बनवताना याचा खरा प्रत्यय आला.” “शिक्षणाचे माध्यम ऑनलाईन झाले आहे, शिक्षण नाही. हे अनुभवायला मिळाले. यामध्ये शाळा व शिक्षकांना निर्णायक भूमिका आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया पाटोद्याचे मराठीचे वरिष्ठ शिक्षक बी. व्ही. साळुंके यांनी व्यक्त केली. बीडमधील विज्ञानाचे वरिष्ठ शिक्षक अतुल मुळे म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम एकाचवेळी आकर्षक/मनोरंजक, जिज्ञासा वाढवणारा आणि बोर्डाच्या दृष्टीने उपयुक्त असला पाहिजे, असा अभ्यासक्रम बांधताना आमची चांगलीच कसरत झाली.” बीडमधील गणिताचे वरिष्ठ शिक्षक शिरीष धावडे म्हणाले, “मला तांत्रिक गोष्टींची फार येत नव्हत्या, आम्ही नवीन तांत्रिक गोष्टी खूप हसत-खेळत शिकलो, वोपा टीमच्या मार्गदर्शनामुळे हे सहज शक्य झाले.” "उसतोड कामगारांचा जिल्हा निसर्गाची अवकृपा आणि उद्योगांची वानवा ही ओळख बदलणार" या कार्यक्रमाला उपस्थित ढवळे ट्रस्टचे प्रमुख सुनिल चव्हाण म्हणाले, "वोपाने आपली पूर्ण ताकद लावून हा उपक्रम पूर्णत्वास नेला. या काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मागे राहू नये, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे." बीडमधील गुरुकुल शाळेचे प्रमुख सुदाम भोंडवे म्हणाले, " बीड जिल्हा हा उसतोड कामगारांचा जिल्हा निसर्गाची अवकृपा आणि उद्योगांची वानवा अशी ओळख होती. मात्र, वोपा टीम मागील 2 वर्षांपासून गुरुकुलच्या विकासासाठी काम करत आहे. आता वोपा संपूर्ण बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. या उपक्रमासाठी खूप गुणवत्तापूर्वक शिक्षक निवडले आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाच्या कामात शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, बीडमध्ये या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोरोनाशी सामना करतानाच शिक्षणासाठी देखील वेळ देत हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मदत केली. हा उपक्रम नक्कीच जिल्ह्याचं भविष्य बदलेल याचा मला विश्वास आहे." संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या