सोलापूर, 18 एप्रिल : कोरोनामुंळ गंभीर होणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन कमी पडतोय. त्यामुळं ऑक्जिनचा औद्योगिक वापर बंद केला आहे. पण या निर्णयामुळं औषध निर्मिती करणाऱ्या उद्योगांनाही अडचण निर्माण झालीय. कारण रेमडेसिविरचे घटक तयार करण्यासाठीदेखील ऑक्सिजन गरजेचा आहे. त्यामुळं आता यावर तोडगा निघणं गरजेचा आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येनं सर्व विक्रम मोडल्यानंतर आता गंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर आणि ऑक्सिजन याच्या तुटवड्यामुळं अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ऑक्सिजनचा औद्योगिक वापर बंद करण्यात आला आहे. उत्पादन होणारा किंवा मिळणारा 100 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी राखीव करण्यात आला आहे. पण या निर्णयामध्ये औषध कंपन्यांनाची अडचण झाली आहे. कारण काही औषधांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन गरजेचा असतो. विशेष म्हणजे रेमडेसिविर या इंजेक्शच्या निर्मितीसाठी लागणारे काही घटक तयार करण्यासाठीही ऑक्सिजन गरजेचा आहे. त्यामुळं हा विषय काहीसा गुंतागुंतीचा बनत आहे.
(वाचा-'या' देशानं महिलांना दिला गर्भवती न होण्याचा सल्ला, समोर आलं धक्कादायक कारण)
सोलापूरमध्ये बालाजी अमाईन्स ही कंपनी रेमडेसिविरसाठी लागणारे घटक तयार करते. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम. रेड्डी यांनी दिव्य मराठीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार रेमडेसिविर औषधामध्ये असलेल्या घटकांपैकी तीन असे प्रमुख घटक आहेत जे फक्त सोलापुरात तयार होतात. ट्रायइथाइल अमाइन, डायमिथाईल फार्मासाईड आणि असिटोनाट्रायल हे तीन घटक ही कंपनी तयार करते. पण ते तयार करण्यासाठी इतर घटकाबरोबरच ऑक्सिजन गरजेचा असतो. पण आता ऑक्सिजन मिळवणंच कठीण झाल्यानं अडचणी वाढल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
(वाचा-'कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते')
या मुद्द्यावर सरकारशी चर्चा आणि पाठपुरावा सुरू असून त्यावर काहीतरी तोडगा काढावा लागेल, असं रेड्डी यांचं म्हणणे आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन दिला जाणार नसला तरी अशा प्रकारच्या औषधीच्या घटकासाठी त्याचा वापर गरजेचा आहे. त्यामुळं तशी परवानगी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Solapur