मुंबई, 26 जून-पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 1 सरकाराच्या कार्यकाळात सर्व प्रकारच्या जाहिरातींवर 5909 कोटी 39 लाख 51 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यात रेडिओ, स्पॉट आणि डिस्प्ले जाहिरातींवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना केंद्र सरकारच्या ब्यूरो ऑफ आउटरीच अॅण्ड कम्युनिकेशन विभागाने आरटीआयच्या उत्तरात सदर माहिती दिली आहे.
अनिल गलगली यांनी 22 मे 2019 रोजी केंद्र सरकारकडे अर्ज सादर करत माहिती घेण्याचा प्रयत्न केला की, वर्ष 2014-15 ते वर्ष 2018-19 या 5 वर्षांच्या कार्यकाळात एनडीए सरकारने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि आउटडोर मीडिया यावर एकूण किती पैसे खर्च केले आहे? केंद्र सरकारच्या ब्यूरो ऑफ आउटरीच अॅण्ड कम्युनिकेशन विभागाने अनिल गलगली यांना वर्ष 2014-15 ते वर्ष 2018-19 या 5 वर्षांच्या कार्यकाळात एनडीए सरकारने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि आउटडोर मीडिया यावर एकूण केलेल्या खर्चाची एक पानांची यादी पाठविली. या यादीत एकूण 4 वर्गात जाहिरातीचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्लान, नॉन प्लान, क्लाइंट डिपार्टमेंट आणि अॅडव्हॉन्स डिपार्टमेंट असून यात डिस्प्ले क्लास, रेडिओ स्पॉट आणि आउटडोर पब्लिसिटी यावर एकूम 5909 कोटी 39 लाख 51 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे.
मोदी सरकारने एनडीए 1 च्या पहिल्या वर्षात म्हणजे वर्ष 2014-15 या आर्थिक वर्षात 979 कोटी 66 लाख रुपये खर्च केले आहे. वर्ष 2015-16 या आर्थिक वर्षात 1162 कोटी 47 लाख रुपये खर्च केले आहे. तिसऱ्या वर्षात वर्ष 2016-17 या आर्थिक वर्षांत 1258 कोटी 32 लाख इतका खर्च करण्यात आला होता. चौथ्या वर्षात 2017-18 या आर्थिक वर्षात सर्वात जास्त 1313 कोटी 57 लाख जाहिरातींवर खर्च झाला. पाचव्या आणि शेवटच्या आर्थिक वर्षात 2018-19 मध्ये जाहिरातींवर वाद होताच मोदी सरकारने खर्चावर नियंत्रण करत कपात करण्याचा प्रयत्न केला होता. तरी सुद्धा हा खर्च 1195 कोटी 37 लाख 51 हजार इतका झाला.
गेल्या 5 वर्षांतील जाहिरातींवर दृष्टिक्षेप टाकला असता डिस्प्ले क्लास आणि रेडिओ स्पॉट या जाहिराती मोदी सरकारच्या पसंतीच्या असल्याची बाब समोर येत आहे. यामुळे याप्रकारच्या जाहिरातींवर अनुक्रमे 2109 कोटी 30 लाख 62 हजार आणि 2172 कोटी 7 लाख 47 हजार रुपये खर्च करण्यात आले तर आउटडोर पब्लिसिटीवर फक्त 612 कोटी 18 लाख 42 हजार रुपये खर्च झाले आहे. अनिल गलगली यांच्या मते रेडिओ स्पॉट आणि डिस्प्ले क्लास या जाहिरातींवर मोदी सरकारची पसंत दर्शविते की सरकारने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत, ज्याचा त्यास जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे.
अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर, उद्धव ठाकरे घेणार निर्णय