बैठक संपल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दिली 'ही' माहिती

भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचीही माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 04:27 PM IST

बैठक संपल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दिली 'ही' माहिती

सातारा, 9 सप्टेंबर : 'राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये जायचं याबाबत आमचा अजून कोणताच निर्णय झाला नाही,' अशी माहिती खासदार उदयनराजेंसोबतच्या बैठकीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचीही माहिती आहे.

खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजेंचा आग्रह आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजे संभ्रमात असल्याची माहिती आहे. उदयनराजे आज रात्रीपर्यंत आपला अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

उदयनराजे का टाळू शकतात भाजप प्रवेश?

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सगळ्या आव्हानांचा सामना करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत जर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाच तर त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे राजेंना पुन्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा सामना करावा लागेल. तेव्हा राष्ट्रवादीकडून उदयनराजेंसमोर कडवं आव्हान निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि अन्य काही नावं चर्चेत होती. त्यामुळे उदयनराजेंनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादी दुसऱ्या नेत्यांना ताकद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

VIDEO: विधानसभेआधी शिवसेनेतच राडा, माजी आमदाराचे मंत्र्यावर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...