मुंबई, 18 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी सोडताना उदयनराजे यांनी पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. 'राष्ट्रवादी सत्तेत असताना फक्त आडवा आणि जरवा, हेच धोरण होते,' असा आरोप उदयनराजेंनी केला. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
'उदयनराजे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. सकाळी माझ्या घरी झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणूक आणि त्यामध्ये उदयनराजे यांची जबाबदारी, पक्षाचे आगामी आक्रमकही आखले गेले होते. पण दुपारनंतर उदयनराजेंनी आपला निर्णय बदलला,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
'आम्ही सत्तेत असताना उदयनराजेंची कोणतीही कामे रोखली, असं माझ्या पाहण्यात नाही. त्यांची काही खासगी कामं रोखली असतील तर मला माहीत नाही. पण मी त्याविषयी आता भाष्य केलं तर अनेक चमत्कारिक गोष्टी बाहेर येतील,' असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी शरद पवारांनी याबाबत भाष्य केलं आहे.
'तुम्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते आता पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का?' असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजितबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येतं.'
'लोकांकडून मिळते उर्जा'
एकीकडे दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला असताना शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. 'मी जर घरात असेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं. पण लोकांना भेटल्यावर मला बरं वाटतं. त्यांच्याकडून मला मोठी उर्जा मिळते,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा