Home /News /maharashtra /

Thane Politics : महाविकास आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीकडून ठाण्यात उघडपणे नाराजी व्यक्त

Thane Politics : महाविकास आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीकडून ठाण्यात उघडपणे नाराजी व्यक्त

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून ठाणे महापालिका मुख्यालयासमोर 'क्लस्टरचं पुन्हा एकदा गाजर, आता तरी जागा हो ठाणेकर' अशी बॅनर लावण्यात आले आहेत.

    ठाणे, 28 जानेवारी : एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीत सेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करताना दिसत असताना मात्र ठाण्यात याच आघाडीत खारेगाव पुलाच्या वादानंतर पुन्हा बिघाडी झाल्याचे समोर आलं आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा क्लस्टर चा मुद्दा हाती घेतला आहे. जिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सामंजस्य करार करत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यानंतर क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात आले, सत्ताधाऱ्यांच्या याच खेळीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली असून पुन्हा एकदा क्लस्टर चे गाजर दाखव्यात आले असल्याची टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून ठाणे महापालिका मुख्यालयासमोर 'क्लस्टरचं पुन्हा एकदा गाजर, आता तरी जागा हो ठाणेकर' अशी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेली 10 वर्ष सत्ताधारी शिवसेना लोकांना मूर्ख बनवत असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी टीका केली. तर पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिवसेना क्लस्टरचे गाजर दाखवत असल्याचे देखील खामकर यांनी यावेळी सांगितले. ठाणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत क्लस्टरच्या मुद्यावरुन सत्तेत आली. मात्र अद्याप कोणतीही वीट रोवली नाही. यादरम्यान पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (27 जानेवारी) सिडको आणि ठाणे महापालिका यामध्ये सामंजस्य करार केला. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत स्वाक्षऱ्या झाल्या होत्या आणि आता क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असून क्लस्टर होणार, असा दावा सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर यांनी 'क्लस्टर पुन्हा गाजर' या आशयाचे बॅनर लावून अजून किती वर्षे क्लस्टरच्या मुद्यावरून निवडणूक लढवणार? असा सवाल यावेळी खामकर यांनी उपस्थित केला. (फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी, शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप) निवडणुका आल्या की क्लस्टरचे गाजर ठाणेकरांना दिले जात असल्याचा टोला खामकर यांनी लगावला. एकप्रकारे ठाणेकरांची दिशाभूल करण्याचे काम सत्ताधारी आणि पालिका प्रशासन करत आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस विक्रम खामकर यांनी केला आहे. या पोस्टरमुळे पुन्हा ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी झालीय असेच समोर आलेय. जितेंद्र आव्हाडांचाही शिवसेनेला टोला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेला टोला लगावला होता. "इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू. कुणीही राजकीय मग्रुरी दाखवू नये. शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्यकर्त्यांना समजावं", अशा शब्दांत आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली होती. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यातील मतभेद अनेकदा जाहीरपणे समोर आले आहेत. विशेष म्हणजे कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पण कार्यक्रमात शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं स्पष्टपणे दिसून आले होते. या कार्यक्रमात श्रेयवादावरुन बॅनरबाजी बघायला मिळाली होती. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला होता. त्याला श्रीकांत शिंदे यांनीदेखील उत्तर दिलं होतं. भर कार्यक्रमात मंचावर हे सगळं घडत होतं. यावेळी एकनाथ शिंदेही मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवून जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढली होती. या कार्यक्रमानंतर आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया देताना परस्परांवर टीका केल्याचं बघायला मिळालं होतं.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या