Home /News /maharashtra /

पार्थ पवारांबद्दल चर्चा सुरू असतानाच अखेर अजित पवार बारामतीत

पार्थ पवारांबद्दल चर्चा सुरू असतानाच अखेर अजित पवार बारामतीत

अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यानंतर तरी पवार कुटुंबात निर्माण झालेलं कथित वादळ शमणार की नाही, हे पाहावं लागेल.

बारामती, 16 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्रबिंदू आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार (Parth Pawar) वेगळा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे आपल्या बारामती दौऱ्यात विविध विकासकामांची करणार पाहणी करणार आहेत. तसंच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आढावा बैठक घेतील आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ देतील. मात्र त्याचवेळी ते कुटुंबात निर्माण झालेल्या तणावाबाबतही घरातील सर्व सदस्यांची चर्चा करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यानंतर तरी पवार कुटुंबात निर्माण झालेलं कथित वादळ शमणार की नाही, हे पाहावं लागेल. बारामतीत वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या बारामतीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अद्याप पूर्णपणे यश आलं नसून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी एकाच दिवशी तब्बल 38 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क आणि सॅनेटायझरचा वापर करावा. जेष्ठ नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बारामती मध्ये एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 60 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून नऊ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालापैकी बारामती शहरातील नऊ व ग्रामीण भागातील 6 असे 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे व इतर तालुक्यातील एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील कुठल्या भागात रुग्ण आढळले? पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये टी सी कॉलेज येथील तीन जण, कल्याणी नगर तांदूळवाडी येथील दोन जण, देसाई इस्टेट येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दोन जण, तांबे नगर येथील एक रुग्ण व न्हावी गल्ली कसबा येथील एक रुग्ण असे शहरातील नऊ व मेडद येथील दोन रुग्ण व माळेगाव येथील एक रुग्ण, जळगाव क प येथील दोन रुग्ण, ढेकळवाडी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण असे एकूण पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 88 अॅंटीजेन तपासणी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बारामती तालुक्यातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बारामती शहरातील 12 आणि ग्रामीण भागातील 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे काल दिवसभरात एकूण 15 rt-pcr व 23 अँटीजेन असे एकूण 38 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ajit pawar, Baramati

पुढील बातम्या