BREAKING : शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात, बड्या नेत्याने केला खुलासा

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याची चिन्हे नसताना गेल्या दहा दिवसांपासून दररोज नवनवीन चर्चा होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 02:14 PM IST

BREAKING : शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात, बड्या नेत्याने केला खुलासा

मुंबई, 04 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 10 दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरीही सेना-भाजपमध्ये युतीच्या फॉर्म्युल्यावरून तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासह 50-50 फॉर्म्युल्याचा आग्रह धरला आहे. तर भाजपकडून मात्र सेनेला म्हणावा तितका प्रतिसाद दिला जात नसल्याचं दिसत आहे. राज्यातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले आहेत. यामुळे महाराष्ट्राचा फैसला दिल्लीत ठरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमधील बैठक संपली आहे. या बैठकीत राजकीय घडामोडी आणि ओल्या दुष्काळावर चर्चा झाली असं फडणवीस यांनी सांगितलं. त्याचबरोबर महाराष्ट्रात लवकरच नवं स्थिर सरकार बनेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अद्याप शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र, या भेटीतून नवीन राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर सेना-भाजपमधील सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरेल असं म्हटलं जात होतं. त्यातच सेनेला जर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर भाजपला सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेबाहेर बसावं लागेलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण विरोधीपक्षातच बसू. सत्ता स्थापनेचा कोणताही विचार नाही असं म्हटलं होतं. मात्र, खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. महायुतीला बहुमत मिळूनही त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही. तसेच गेल्या पाच वर्षांत त्यांच्यामध्ये जसे वाद होते त्यापेक्षा अधिक वाद आता आहेत असं सुनील तटकरेंनी सांगितलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 170 आमदार संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्याबद्दल तटकरे यांनी सांगितलं की, कशाच्या आधारे राऊत यांनी हे सांगितलं हे त्यांनाच माहिती. बहुतेक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे सर्व आमदार मिळून हा आकडा सांगितला असावा असंही तटकरे यांनी म्हटलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि तो शिवतिर्थावर शपथ घेईल असं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. 'सत्तेचं गणित जमलं की आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. पण आता अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही.' असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

Loading...

दरम्यान, गिरीश महाजन यांना संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला आमच्या पक्षाने बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. सध्या आमची वेट अँड वॉच अशी भूमिका आहे. सेनेचे नेते बोलत आहेत. त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी बोलावं आमची कोणतीही तक्रार नाही असंही महाजन यांनी म्हटलं. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एकदाच त्यांची भूमिका मांडली आहे. त्यानंतर कोणत्याच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. त्यामुळे सत्ता संघर्षाचा हा पेच कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : सत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...