पुणे, 17 एप्रिल : रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन (Remdesivir injection dose for covid treatment) मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP Amol Kolhe) यांनी रेमडेसिवीरला पर्यायी कोणतं औषध आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली आहे.
'रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे? लक्षात घ्या, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर हे सुचवलं आहे. ते रुग्णाला द्यावं. शासन व प्रशासन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,' अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'दिल्लीश्वर कोठे आहेत?' देशातील गंभीर स्थितीवरून शिवसेना नरेंद्र मोदींसह भाजपला भिडली!
'सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर पुरवठ्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे अशी माझी नम्र विनंती आहे,' असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यासह देशभरात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक जीवाचं रान करत आहेत. मात्र कमी पुरवठा आणि त्यातही होणारा काळाबाजार यामुळे हे इंजेक्शन मिळवताना मोठा संघर्ष करावा लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus