उदयनराजेंच्या अडचणी वाढणार, शिवेंद्रराजे भाजपच्या संभाव्य उमेदवाराच्या भेटीला

उदयनराजेंच्या अडचणी वाढणार, शिवेंद्रराजे भाजपच्या संभाव्य उमेदवाराच्या भेटीला

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचे सातारा लोकसभेचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची भेट घेतली आहे.

  • Share this:

सातारा, 23 फेब्रुवारी : साता-यातील राजकारणाला आता आणखी एक कलाटणी मिळत असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचे सातारा लोकसभेचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची भेट घेतली आहे.

शिवेंद्रराजे आणि भाजपचे नरेंद्र पाटील हे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये भेटले. शिवेंद्रराजे आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवाराला भेटून शिवेंद्रराजे हे उदयनराजेंना धक्का देण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत की काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील या दोन राजेंमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी आपण अजूनही उदयनराजेंवर नाराज असल्याचं स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील भेटीने उदयनराजेंच्या अडचणी वाढतात का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, युतीच्या घोषणेनंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

2014 ला सेनेकडून RPI आठवले गटाला सातारा लोकसभा मतदारसंघ सोडला होता. पण आता RPI भाजपच्या गोटात आहे. आणि भाजपने अद्यापपर्यंत आरपीआयला एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघावर आता भाजप स्वत:चाच उमेदवार देण्याची शक्यता आहे.

भाजपकडून या मतदारसंघासाठी चर्चेत असणारे नरेंद्र पाटील हे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत. ते जर उदयनराजेंविरोधात उभे राहिले तर या मतदारसंघात चांगली लढत होईल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सातारा आणि उदयनराजे

सातारा आणि कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा, याबाबत निर्णय झाला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली होती. पण नक्की कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, हे मात्र पवारांनी सांगितलं नाही. असं असलं तरीही राष्ट्रवादीकडून आता उदयनराजेंचं नाव निश्चित मानलं जात आहे.

VIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात

First published: February 23, 2019, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading