काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश, सुभाष देशमुखांनी जाहीर केली नावं

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश, सुभाष देशमुखांनी जाहीर केली नावं

केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

  • Share this:

सोलापूर, 1 सप्टेंबर : भाजपची महाजनादेश यात्रा आज सोलापूरमध्ये दाखल होत आहे. सोलापुरात आज भाजपकडून जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे उस्मानाबादमधील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह त्यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील तसंच कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, साताऱ्यातील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

सोलापूरमधील नेत्यांबद्दलचा सस्पेन्स कायम

विविध जिल्ह्यांतील तीन नेते सोलापूरमधील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरीही खुद्द सोलापूरमधील नेत्यांचा भाजप प्रवेश मात्र लांबणीवर पडला आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. तसंच काँग्रेसचेही सोलापूरमधील काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र अजून राजकीय वाटाघाटी पूर्ण झाल्या नसल्याने या नेत्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे.

उदयनराजे आणि पक्षबदलाच्या हालचाली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार, हे आता जवळपास निश्चित आहे. कारण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

दरम्यान, 'मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं,' असं म्हणत उदयनराजे यांनी पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली. एकीकडे उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या