इम्तियाज अली, प्रतिनिधी
जळगाव, 17 जानेवारी : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाथाभाऊ अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. कार्यकर्ता असो की कुणीही फोन केला तर नाथाभाऊ बोलण्यासाठी हजर असतात. पण मागील 8 दिवसांपासून एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. पहिल्यांदाच एकनाथ खडसे आठ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सर्वसामान्यांचा केव्हाही फोन रिसिव्ह करणारे मात्र पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्याने खडसे समर्थक संभ्रमात पडले आहे.
((कपडे बॅगेत भरून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, आज होणार चौकशी)
एकनाथ खडसे हे मुंबईत असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची तब्येत खराब असून आराम करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र नेहमी संपर्कात राहणारे नाथाभाऊ पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
मध्यंतरी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. पण एकनाथ खडसेंनी याबद्दल स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.
अजितदादांनी सांगितला वंचित-शिवसेना युतीचा फॉर्म्युला
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर युतीची चर्चा रंगली आहे. याच मुद्यावर अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
आता त्यांना वरिष्ठांनी काही सांगितलं असेल तर त्याबद्दल मला काही माहिती नाही. आमची महाविकास आघाडी असली तर काही लोक आमच्यासोबत येण्यासाठी चर्चा करण्यासाठी येतात. काही लोक हे त्या त्या पक्षाच्या कोट्यातून निर्णय घेतात. काँग्रेसला जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांच्या कोटातून निर्णय घ्यावा. शिवसेनेला जो कोटा दिला आहे, त्यांच्या कोट्यातून त्यांनी मित्र पक्षाला सामावून घ्यावं. राष्ट्रवादीने आपल्या मित्रपक्षाला आपल्या कोट्यात सामावून घ्यावं, असं केलं तर अडचणी येणार नाही, असंही अजितदादा म्हणाले.
(mlc election : सत्यजीत तांबेंच्या खेळीबद्दल अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...)
' प्रकाश आंबेडकर हे, का आमच्यावर शंका घेतात हे मला माहीत नाही. पवार साहेब यांनीच ओपन कॅटेगरी मध्ये पाच लोकांना निवडून आणले होते. 1996-98 च्या निवडणुकीमध्ये निवडून आणले. त्यात प्रकाश आंबेडकर होते. आमचे काही निवडून आले होते. आठवले यांच्या पक्षासोबत आमची युती होती. आम्ही त्यांना पंढरपूरमधून निवडून आणले. त्यानंतर त्यांना शिर्डीत उमेदवारी दिली. पण शिर्डीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आमच्या पक्षाच्या वरिष्ठांबाबत अशी वक्तव्य करतात, पण आम्ही तसे वागत नाही. असं आमचं मत आहे, असा टोलाही अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse