मुंबई, 8 मार्च : भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारा आणि ट्रोल करणाराही मोठा वर्ग आहे. याबाबतच बोलतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'अमृता फडणवीस यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा जसा अधिकार आहे तसाच, फॉलोअर्सना त्यांना ट्रोल करणाचाही अधिकार आहे,' असं अजब वक्तव्य केल्यामुळे क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी अदिती आज पिंपरी चिंचवड मध्ये आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, 50 टक्के आरक्षण नसताना ज्या दिवशी महिलांना संधी दिली जाईल, तोच दिवस खऱ्या अर्थाने माझ्यासाठी महिला दिवस असेल असं म्हणत अदिती यांनी राजकारणातील महिलांची स्थिती दर्शविणारं विधानही केलं. तर राज्यात दिशा कायदा लागू करण्याआधी तो एवढा कठोर करा की आपल्याला इतर राज्यात अभ्यासासाठी जाण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी केल्याचंही आदती यांनी सांगितलं आहे.
अमृता फडणवीस आणि ट्विटर ट्रोलिंग
गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करू लागल्या आहेत. विविध मुद्द्यांवरील आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते ट्विटर, फेसबुक अशा माध्यमांचा वापर करतात. पण गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (@fadnavis_amruta) या देखील ट्विटरवर प्रचंड सक्रिय झाल्या आहेत.
हेही वाचा- ...आणि अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोडले हात, हे आहे कारण
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत दरी निर्माण झाली. साहजिक याचा परिणाम देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांवरही झाला. हे दोनही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच वादात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेत थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनाही सोशल मीडियावर टार्गेट करण्यात आलं होतं.