Home /News /maharashtra /

'मालिका पुढे चालत राहावी एवढीच आमची इच्छा', किरण मानेंच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

'मालिका पुढे चालत राहावी एवढीच आमची इच्छा', किरण मानेंच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी आज जितेंद्र आव्हाडांची (Jitendra Awhad) भेट घेतली. या भेटीनंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

    मुंबई, 20 जानेवारी : "मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) ही मालिका पुढे चालत राहावी एवढीच आमची इच्छा आहे. प्रोडक्शन हाऊसला माहिती नाही, असंच होऊ शकत नाही. मी एकदा भूमिका घेतली की त्यातून पाय मागे घेतो, असं माझ्या 35 वर्षांच्या राजकीय आयुष्यात झालेलं नाही. मराठी कलाकरांचे बॅकग्राउंड बघा. अचानक तुम्ही सांगाल, जा रे घरी बसा. ज्यांना गरीबी माहिती आहे अशातला मी एक आहे. बापाची नोकरी गेल्यानंतर माझी आई तीन वर्ष सायकल चालवून जायची आणि शिवणकाम करायची. मी एका गरीबाची बाजू घेतोय. किरण मानेचा बाप आज आजारी पडलाय. भांडणं मिटवा, एकत्र राहा", अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मांडली. अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी आज जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली. या भेटीनंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? "स्त्री कलाकारांनी किरण माने यांची बाजू घेतली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, एका स्त्रीने त्यांच्यावर आरोप केला आहे. बाकीच्या स्त्रियांनी त्यांची बाजू घेतली आहे. या प्रकरणाला दुसरा कसलाही रंग न लावता प्रोडक्शन हाऊस आणि चॅनलने एकत्र बसावं. हा तिढा सोडवावा आणि कोणावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका चॅनलने घ्यावी", असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. "दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, ठिक आहे मी प्रोडक्शन हाऊसला घेऊन येतो. आपण बसूया. उद्या-परवा मिटिंग होईल. सतीश राजवाडे यांनी आपल्याला काही माहितीच नाही, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांना प्रोडक्शन हाऊसकडून समजलं, असं सांगितलं. पण प्रोडक्शन हाऊसने जे तुम्हाला कळवलं तेच किरण माने यांना कळवण्याचा प्रयत्न झाला का? तर त्यावर ते माहित नाही म्हणाले", असं आव्हाडांनी सांगितलं. "किरण माने हा एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून मुंबईत आलेला मुलगा आहे. त्याच्या कुटुंबाची बागायची शेतीही नाही. गरीब घरातून तो आला आहे. लोकप्रिय आहे. घराघरात पोहोचला आहे", असं आव्हाड म्हणाले. ('आता शाळा सुरू केल्या तर..', सरकारच्या निर्णयानंतर तज्ज्ञांनी सांगितला मोठा धोका) "एखाद्याला नोकरीवरुन काढणं, म्हणजे चॅनलच्या बाबतीत ज्याप्रकारे पत्रकार पुण्य प्रसून बाजपेयी यांना काढण्यात आलं. मिलिंद खांडेकर यांना काढण्यात आलं. अशी अनेक नावं आहेत, ज्यांना चॅनलमधून बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावर काय बिततं याचा विचार आपणही करायला हवं. एका दिवसात नोकरी जाणं हे किती वेदना देऊन जातं. किती ओझं अंगावर येतं की, मी आता जगायचं कसं? हे विचार घेऊन मी मध्ये पडलो आहे. मला किरण माने, प्रोडक्शन हाऊस, चॅनल, कलाकार काहीही घेणंदेणं नाही. एखाद्याला नोकरीवरुन काढताना तुला या कारणास्तव काढतोय, अशी समज तर द्यायला हवी. मी भूमिका घेतली आहे. उगाच काहीतरी कुणाचा बोलवता धनी वगैरे काही नाही. किरण माने स्वत: टाईप करायचा. मी चित्रपटसृष्टी आणि नाटकक्षेत्राशी संबंधित नाही. किरण माने हे प्रकरण माझ्यापर्यंत पहोचवण्यात आलं. सगळं प्रकरण बघितल्यानंतर मला भूमिका घ्यावी, असं वाटलं", असंही आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केलं. नेमकं प्रकरण काय? अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांनी आपण राजकीय भूमिका मांडली म्हणून आपल्याला काहीही पूर्व सूचना न देता मालिकेत काढून टाकण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. त्यांनतर पत्रक जाहीर करत वाहिनीने किरण माने गैरवर्तवणूक करत होते वारंवार सांगूनही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होतं. या दोन्ही बाजूने होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाने हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या