मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार मुख्यमंत्रिपद? नव्या फॉर्म्युल्याची चर्चा

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार मुख्यमंत्रिपद? नव्या फॉर्म्युल्याची चर्चा

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : राज्यात नव्या सरकारस्थापनेविषयीच्या हालचाली आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काल झालेल्या मॅरेथॉन बैठकीत संभाव्य महाशिवआघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्याचवेळी या आघाडीत सत्तास्थापनेच्या नव्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

सत्तेचं गणित जुळून आल्यास महाराष्ट्रात तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतूनच तीन तर राष्ट्रवादीकडून एका नेत्याचं नाव चर्चेत आहेत.

1. उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून थेट भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन पूर्ण करत मी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महाशिवआघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात पुढे असू शकतं. कारण उद्धव ठाकरे यांचा राजकारणातील अनुभव लक्षात घेता त्यांना आघाडीतील इतर पक्षाचा विरोध होण्याची शक्यता कमी आहे.

2. एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करणाऱ्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं पक्षातही चांगलं वजन आहे. अनेक आमदारांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. तसंच मागील युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. पक्षातील त्यांच्या कामाच्या अनुभवामुळेच शिवसेनेनं आताही त्यांच्या खांद्यावर विधीमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ठाकरे कुटुंबाबाहेरील व्यक्तीचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार झाल्यास एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर असू शकतं.

3. आदित्य ठाकरे

वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट केलं जात असल्याचं पाहायला मिळत होतं. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी याबाबत इच्छाही व्यक्त केली होती. मात्र निवडणूक निकालानंतर कोणाकडूनही आदित्य ठाकरे यांचं नाव आक्रमकपणे पुढे आणलं जात नसल्याचं दिसत आहे. कारण सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संसदीय राजकारणात नवख्या असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सहमती होणार का, याबाबत संभ्रम आहे.

4. अजित पवार

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या जागा निवडणुकीत आल्या आहेत. शिवसेनेनं 56 तर राष्ट्रवादीने 54 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फार मोठा फरक नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येऊ शकतो. अशातच राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते असलेले अजित पवार यांचं नाव पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी समोर येऊ शकतं.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

Tags:
First Published: Nov 21, 2019 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading