जितेंद्र जाधव, बारामती, 27 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी जात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी निवडणुकीत अजून पंधरा दिवस मिळाले असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 50 जागा अधिक आल्या असत्या, असा दावाही केला.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण त्याचवेळी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीनेही राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांचं या निवडणुकीत काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आणि उदयनराजेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी या निवडणुकीत मोठ्या फरकाने बाजी मारत सातारा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं.
सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय झाल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला गड राखल्याचं बोललं जात आहे. मात्र हा गड राखताना पवारांना आपला सिंह गमवावा लागला. कारण साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवणुकीत पराभव झाला आहे. कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला.
दरम्यान, सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील जाएंट किलर ठरले आहेत. उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता पाहता त्यांचा पराभव कठीण मानला जात होता. मात्र उदयनराजेंचा पक्षांतराचा निर्णय लोकांना पसंत पडला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं आहे.
VIDEO : राष्ट्रवादीकडून नवा विरोधी पक्षनेता कोण? 'या' नावांची चर्चा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shashikant shinde