सोलापूर, 19 जुलै: अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं (Ram mandir ayodhya) भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.
हेही वाचा...शरद पवारांनी मृत्यूदराबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाले धोकादायक शहरामध्ये सोलापूर
कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवी. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
आम्हालाही वाटत की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत. ते दिल्लीत जाऊन या मुद्द्यावर प्रश्न मांडतील, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.
मृत्यूदर चिंताजनक! धोकादायक शहरामध्ये सोलापूर
देशातील धोकादायक शहरामध्ये सोलापूरचा समावेश होतो. सोलापूरचा मृत्यूदर काळजी करण्यासारखा आहे. राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर जास्त आहे. मुंबई, जळगाव सुधारले मात्र सोलापूर सुधारले नाही, असं राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
शरद पवार म्हणाले की, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंचा मला फोन आला. माझ्या मतदारसंघातील परिस्थिती बिकट आहे, त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे बैठक घेतली. सोलापूरचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. मी शहराचे काही देणे लागतो म्हणून मी येथे आलो.
देशातील धोकादायक शहरामध्ये सोलापूरचा समावेश होतो. राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर जास्त असून तो काळजी करण्यासारखा असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. या तीन तालुक्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांना सुचना दिल्या आहेत तसेच मुख्य सचिव अजोय मेहता यांना 21 किंवा 22 तारखेला सोलापूरला पाठवणार आहे. तेही सोलापूर आणि बार्शीचा दौरा करतील. परिस्थितीचा आढावा घेतील.
हेही वाचा..राम मंदिराच्या भूमिपूजनसाठी 5 ऑगस्ट निवडण्यामागे आहे खास कारण
सोलापूर जिल्हा हा आपत्तीवर मात करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर शहराने ब्रिटीशांना काही काळाच हकलून लावलं होतं. ब्रिटिशांवर मात केली त्यामुळे कोव्हिडवर नक्की मात करेल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir, PM narendra modi, Ram Mandir, Ram mandir ayodhya