मुंबई, 5 जुलै- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी (8 जुलै) भेट देणार आहेत. तिवरे धरण फुटल्याने यामध्ये 23 जणांचा बळी गेला आहे. धरण फुटीनंतर संबंधित अधिकारी व शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर शरद पवार सोमवारी दुपारी 12 वाजता तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत. शरद पवार हे 7 ते 8 जुलैपर्यंत पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर असून पुणे येथील साखर कारखान्याच्या सेमीनारला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
खेकड्यावरून राजकारण...
खेकडे एकमेकांचे पाय खेचतात, अशी म्हणायची एक पद्धत आहे, मात्र आता हे पाय खेचणारे खेकडे धरणही फोडत असल्याचा अजब दावा केला आहे. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने चक्क पोलीस ठाण्यात पोलिसांना खेकडे देत आंदोलन केले. याच आरोपी खेकड्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आता पोलीस खरंच खेकड्यांना तुरूंगात टाकणार की खेकड्याची वृत्ती असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तानाजी सावंत म्हणाले, खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळेच फुटले तिवरे धरण
खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळेच तिवरे धरण फुटले, असा जावाईशोध मंत्री तानाजी सावंत यांनी लावला. या आधी पुण्यातील मुठा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटल्याचे अजब तर्क लावला होता.
तानाजी सावंत सोलापुरात बोलत होते, तानाजी सावंत, युवासेना नेते आदित्या ठाकरे जलसंपदा विभागाच्या आष्टी उपसासिंचन योजनेच्या उद्घाटनाला उपस्थित होते. या वेळी सावंत यांनी हे अजब वक्तव्य केले. तिवरे धरण फुटले, त्याला कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
SPECIAL REPORT: आरोपी खेकड्यांना खरंच पोलीस तुरुंगात डांबणार की काय?