संजय शिंदेंची नवी राजकीय खेळी राष्ट्रवादीसाठी धोक्याची, मुख्यमंत्री पुन्हा शह देणार?

शिंदे बंधूंनी पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत न करता त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 09:30 AM IST

संजय शिंदेंची नवी राजकीय खेळी राष्ट्रवादीसाठी धोक्याची, मुख्यमंत्री पुन्हा शह देणार?

सोलापूर, 16 ऑगस्ट : सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू असतानाच दोन्ही शिंदे बंधूंनी पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत न करता त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेले संजयमामा यांनी 11 लाख तर माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी 10 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्तता निधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सुपूर्द केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: पूरग्रस्तांसाठी सांगली-कोल्हापुर मध्ये तळ ठोकून असताना शिंदे बंधूंनी मुख्यमंत्राकडे जाऊन मदतनिधी देण्याचा मार्ग स्वीकारल्याने ही तर विधानसभेची पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्येही आमदार बबनदादा शिंदे गैरहजर होते. तेव्हापासूनच बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर आता मदतनिधीचं निमित्त साधत दोन्ही शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीतील हे  दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला आणखीनच जोर मिळाला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ चांगलाच गाजला. कारण भाजप आणि राष्ट्रवादीने माढ्याची लढाई प्रतिष्ठेची केली होती. माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार होते.

माढ्याच्या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपने बाजी मारली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता विधानसबा निवडणुकीआधीही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कारण लोकसभेला पराभूत झालेले संजयमामा शिंदे आता विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

संजयमामांची विधानसभा एण्ट्री आणि राष्ट्रवादीचा धोका

संजयमामा शिंदे विधानसभेसाठी करमाळा मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतचे संकेतही दिले होते. पण करमाळ्यात राष्ट्रवादीकडून रश्मी बागल यादेखील उत्सुक असल्याची चर्चा आहे. अशातच जर संजयमांमानी विधानसभा लढण्याचा निर्णय घेतल्यास करमाळ्यातील तिकीटावरून राष्ट्रवादीतच स्पर्धा निर्माण होऊ शकते.

संजयमामा शिंदे लोकसभेवर निवडून गेले असते तर करमाळ्यात पक्षांतर्गत स्पर्धा झाली नसती. पण आता एकाच तालुक्यात दोन इच्छुक तयार होत असल्याने राष्ट्रवादीची मात्र अडचण झाली आहे. अशातच आता संजय शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत.

पूर ओसरला, मुख्यमंत्री पुन्हा निघाले महाजनादेश यात्रेला, पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 09:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...