पार्थ पवारांच्या ड्रायव्हरचे मुंबईतील कुलाब्यातून अपहरण

पार्थ पवारांच्या ड्रायव्हरचे मुंबईतील कुलाब्यातून अपहरण

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या गाडी चालकाचे मुंबईतून कुलाबा येथून अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 11 जुलै- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या गाडी चालकाचे मुंबईतून कुलाबा येथून अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज ज्योतीराम सातपुते (वय-24) असे पार्थ यांच्या चालकाचे नाव असून तो सुपा (ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्वावस्थेत आढळून आला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत किडनॅपींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनोज सातपुते याने दिलेल्या जबाबावरून अज्ञात अपहरणकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ पवार यांची गाडीवर ( एमएच 42 एएफ-0009) मनोज हा चालक आहे. 3 जुलैला दुपारी 4 वाजता तो पार्थ यांच्यासोबत मुंबईतील चर्चगेट येथे रात्री 10 वाजता पोहोचला. दुसऱ्या दिवशी आमदार निवासात त्याने मुक्काम केला. 5 जुलैला मनोज सायंकाळी 6 वाजता मोलाइलमध्ये पिक्चर घेण्यासाठी पायी चालत कुलाबा येथे गेला होता. मोबाइलमध्ये पिक्चर घेऊन मनोज रात्री 9 वाजता कुलाब्याहून चर्चगेटकडे पायी निघाला असता बेस्ट डेपोजवळ मागून एक लाल रंगाची ओम्नी गाडी आली. 'तू पार्थ पवार यांचा ड्रायव्हर आहेस का?' असा प्रश्न ओम्नीच्या ड्रायव्हरने केला. मनोज हो म्हणाला. पार्थ पवार यांना एक वस्तू द्यायची आहे. त्यांचा पत्ता आम्हाला सापडत नाही, असे सांगून त्याने मनोजला गाडीत बसण्यास सांगिसले. ओम्नीमध्ये मागील सीटवर एक जण बसला होता. कुलाबा सर्कलपर्यत मनोज शुद्धीवर होता. अपहरण कर्त्यांशी कोणतेही संभाषण झाले नसल्याचे मनोजने सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 जुलैला सकाळी 6 वाजता सुपा येथील घाटावर रस्त्याच्या कडेला पडला होता. अंगावरील शर्ट, पॅंट फाटलेले होते. संपूर्ण अंग दुखत होते. उजव्या पायाच्या करंगळीतून रक्त भळभळत होते. कसा तरी उभा राहिलो. एसटी बसला हात देऊन सणसवाडी येथे उतरवण्यास सांगितले. परंतु झोप लागली. कल्याणी फाटा येथे सकाळी 8 वाजून 30 मिनिटांला उतरून सणसवाडीला पायी चालत गेलो.  सणसवाडीला पोहोचल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून कुटुंबीयांना माहिती दिली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत किडनॅपींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पार्थ पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनी अज्ञातांवर अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास कुलाबा पोलीसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या चालकाला मारहाण करुन अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामागे कुठले कारण आहे हे समजू शकले नाही. मात्र या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांचा तपास सुरु आहे.

राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? अशोक चव्हाण म्हणतात...

First published: July 11, 2019, 7:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading