मुंबई, 8 फेब्रुवारी : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोकण दौरा चांगलाच चर्चेत राहिला. या दौऱ्यात अमित शहा यांच्यासह भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. याच टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'मी पुन्हा येईन' म्हणणार्या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून 25 वर्ष लागतील असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
राणेंवरही साधला निशाणा
'गेले 22 वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' चे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार 25 वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार,' असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा - 'मोदी लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत', राष्ट्रवादीने केली विखारी टीका
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी फडणवीसांवर टीका करताना नारायण राणे यांनाही टोला लगावल्याने आगामी काळात राणेंकडूनही राष्ट्रवादीवर पलटवार केला जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात याबाबत नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Narayan rane, Nawab malik