काँग्रेसची नाराजी आणि भाजपचे 105 आमदार, राज्यातील राजकारणावर जयंत पाटलांचं भाष्य

काँग्रेसची नाराजी आणि भाजपचे 105 आमदार, राज्यातील राजकारणावर जयंत पाटलांचं भाष्य

छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही,' असंही जयंत पाटील म्हणाले.

  • Share this:

नाशिक, 25 जुलै : राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. वैतरणेचं पाणी मुकणेमध्ये सोडण्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पाटील यांनी राज्यातील राजकीय स्थितीवरही भाष्य केलं आहे. 'संजय राऊतांच्या मुलाखतीचे भाजप कौतुक कसं करणार? सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरू ठेवाव्या लागतात. संख्या 105 असल्याने विरोधकांचा असा प्रयत्न आहे,' असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.

'काँग्रेसवर अन्याय होत कामा नये. मुख्यमंत्री काँग्रेसशी देखील चर्चा करत आहेत. काँग्रेसकडून नाराजी नाही. कालच आम्ही सगळे एकत्र होतो. अशोक चव्हाण नाराज नाहीत, हे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही,' असंही जयंत पाटील म्हणाले.

राम मंदिरावर भाष्य

'कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदार संघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं. राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही, पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे पण धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीच्या बाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील,' असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, नाशिकच्या पाणीप्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'शेतकऱ्यांना भेटून चर्चा केली जाईल. बाहुली धरण परिसरात पर्यटनाची चांगली संधी आहे. जलसिंचन विभागाकडे काही जागांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सरकारकडे सध्या पैसे नाहीत, पण खाजगी उद्योजकांनी पुढे यावं,' असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 25, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या