संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले जयंत पाटील

संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : राज्यात येऊ घातलेल्या महाशिवआघाडीच्या मंत्रिमंडळामधील राष्ट्रवादी काँग्रेसची नावं निश्चित झाली आहेत. मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि नवाब मलिक, धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या ज्येष्ठ नेत्यांसह मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे एकूण 15 मंत्री असतील, अशीही माहिती आहे. या सगळ्या नावांबद्दल आता शरद पवार यांच्या निवासस्थानी खलबतं सुरू असून लवकरच सर्व मंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदातही वाटा मिळणार?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काल झालेल्या मॅरेथॉन बैठकीत संभाव्य महाशिवआघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्याचवेळी या आघाडीत सत्तास्थापनेच्या नव्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

सत्तेचं गणित जुळून आल्यास महाराष्ट्रात तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तीन तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं नाव चर्चेत आहे.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

First Published: Nov 21, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading