मुंबई, 08 एप्रिल: लसीच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचा तुटवडा (Shortage of corona vaccine in Maharashtra) असून केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी यावर प्रतिक्रिया देत, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात असून राज्य सरकार विनाकारण राजकारण करत असल्याची टीका केली होती. या सर्वानंतर राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारनं सुरुवातीपासून महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. (Jayant Patil Blame center over vaccine shortage)
वाचा - या तारखेपासून सरकारी आणि खासगी कार्यालयात मिळणार Corona Vaccine, वाचा सविस्तर
कोरोनाच्या रुपानं महाराष्ट्र स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेल्या संकटाला सामोरा जात आहे. राज्याचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीनं या संकटाविरोधात लढतंय. पण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला पहिल्यापासूनच अगदी मर्यादित सहकार्य केल्याची टीका जयंत पाटलांनी केली. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडावी अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते असंही जयंत पाटील केंद्रावर टीका करताना म्हणाले आहेत.
गुजरातला झुकते माप-पाटील
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 12.30 कोटी आहे. त्यात अॅक्टिव्ह रुग्ण 4.73 लाखांच्या आसपास आहेत. असं असताना राज्याला आतापर्यंत 85 लाख लसी मिळाल्या. पण दुसरीकडं गुजरातची लोकसंख्या 6.5 कोटी आहे तर त्याठिकाणि अॅक्टिव्ह रुग्णसंक्या 17 हजार असूनही गुजरातला 80 लाख लसी मिळाल्याचं जयंत पाटील म्हणाले. देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्या, मात्र तसं मुद्दाम होऊ दिलं जात नसल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे.
वाचा -मुंबईत लस संपण्याच्या भीतीने नागरिकांची धाव, लसीकरण केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष दिसून आला. फक्त महाराष्ट्रात विरोधी विचारांचं सरकार असल्यानं महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची एकतर पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती देण्यात आली असावी असं पाटील म्हणाले. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, दिलेल्या लसी याची शहानिशा न करता परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना, राज्यात लसीचा तुटवडा निर्माण होण्याचे संकेत दिले होते. तसेच राज्यातील वाढता संसर्ग पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्यांना लस उपलब्ध करून द्यावे, ही मागणीही मांडली होती. मात्र केंद्रानं या मुद्द्याचं राजकारण होत असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर आता राज्यातून यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Jayant patil, Maharashtra