हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारलं, शेलक्या शब्दांत घेतला समाचार

हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारलं, शेलक्या शब्दांत घेतला समाचार

'चंद्रकातदादा वेड्यासारखं आणि डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वक्तव्य करून ते आपलं हसं करून घेत आहेत'

  • Share this:

कोल्हापूर, 22 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (NCP Leader Hasan Munshrif) यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील मतिमंद आणि मानसिकरुग्णासारखी वक्तव्य करत आहेत.

चंद्रकातदादा वेड्यासारखं आणि डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वक्तव्य करून ते आपलं हसं करून घेत आहेत, असा सणसणीत टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

हेही वाचा...मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं 'हे' उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना छोटे नेते म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. या टीकेचा हसन मुश्रीफ यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.

कोल्हापूरातील आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात हसन मुश्रीफ बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्त्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडवला. 10 ते 12 लोकसभेच्या व 10 ते 12 विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

तर चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit pawar) यांनी देखील जोरदार हल्लाबोल करत चंद्रकांत पाटलांना फटकारलं आहे. 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखे आहे. पवारसाहेबांवर बोलण्याइतकी आपली किंमत आहे का?' अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांतदादा?

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा...महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांनी दागली टीकेची तोफ

देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी खोलात जाऊन कायद्याचा अभ्यास केला आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये घुसूच शकत नाही, याची व्यवस्था केली आहे. मात्र, राजकारणासाठी काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम करीत आहेत. राजकारणासाठी समाजात विष कालवण्याचे काम करणाऱ्यांचा शर्ट धरला पाहिजे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला.

Published by: Sandip Parolekar
First published: November 22, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading