मुंबई, 17 जुलै : महाराष्ट्रातील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करताना विलंब करत असल्याचा आरोप करत शिवसेना आज रस्त्यावर उतरली. वांद्रे-कुर्ला संकुलातील भारती अँक्सा या खाजगी विमा कंपनीच्या मुख्यालयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला. सत्ताधारी शिवसेनेनंच मोर्चा काढल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.
'पीक विम्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनाच 'इशारा मोर्चा' काढत आहे. भाजप, शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा...एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात, मांडीला मांडी लावून बसतात मग त्यांच्या यंत्रणेविरोधातच आंदोलन करतात. अरे काय लावलंय यांनी!' असं ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
नवनीत राणांनीही केली टीका
'शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष नाटक करत आहेत. राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,' असा आरोप करत नवनीत राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
'जे सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत. त्यामुळे आता बनावट खत कंपन्यांवर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारने नियंत्रण समिती स्थापन करावी,' अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
दरम्यान, वांद्रे-कुर्ला संकुलातील भारती अँक्सा या खाजगी विमा कंपनीच्या मुख्यालयावर शिवसेनेनं महामोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची पीक विमा योजनेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या सर्व खासगी विमा कंपन्यांच्या विरोधात हा मोर्चा होता, अशी शिवसेनेची भूमिका आहे.
भरधाव कारच्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद