'...म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट', धनंजय मुंडेंचे भावुक उद्गार

'...म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट', धनंजय मुंडेंचे भावुक उद्गार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीतील सभेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. नेत्यांकडून प्रतिस्पर्धांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीतील सभेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत भावनिक उद्गार काढले आहेत.

'आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचा साधा फोटोसुद्धा नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता,' असं म्हणत केज मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ विडा इथं आयोजित केलेल्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.

'या विधानसभेची निवडणूक ही इमानदारी विरुद्ध बेईमानीची आहे. सर्व कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेब यांच्या संगनमताने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी दिल्यानंतरही त्यांनी पक्षांतर केले. याला म्हणतात बेईमानी, या बेईमानीला केजच्या मातीत गाडा,' असं आवाहनही यावेळी धनंजय मुंडे यांनी केजमधील कार्यकर्त्यांना केलं.

परळीत राजकीय घमासान

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही मतदारसंघातील हायहोल्टेज सामन्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातही मोठं घमासान पाहायला मिळत आहे. कारण या मतदारसंघात भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत तसं निवडणूक निकालाबाबत आडाखे बांधले जात आहेत. त्यातच परळीत यंदाची निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी अवघड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता याबाबत आज स्वत: पंकजा मुंडे यांनी भाष्य करत पलटवार केला आहे. 'महाराष्ट्रभर आता परळीत माझं काही खरं नसल्याच्या अफवा पसरत आहेत,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर उत्तर दिलं आहे.

VIDEO : पुण्यात मोदींचं 'एअर स्ट्राईक' अमोल कोल्हेंच्या सभा रद्द, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 10:13 PM IST

ताज्या बातम्या