'किती नीच पातळी गाठणार?', शरद पवारांची सुरक्षा काढताच मोदी सरकारवर तुटून पडले राष्ट्रवादीचे नेते

'किती नीच पातळी गाठणार?', शरद पवारांची सुरक्षा काढताच मोदी सरकारवर तुटून पडले राष्ट्रवादीचे नेते

सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारनं तडकाफडकी हटवली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

'ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली... किती नीच पातळी गाठणार? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे... केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध,' असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

'मा.शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून काही होणार नाही. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्रचा इतिहास आहे. लोकांचे प्रेम,आपुलकी आणि आपलेपणा हे साहेबांचं सुरक्षाकवच आहे. सुरक्षा व्यवस्था काढली बरं झालं, आज महाराष्ट्राला समजलं भाजप किती खोट्या मनोवृत्तीचे आहेत ते,' अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

जयंत पाटील आक्रमक

'गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजप आता सूडबुद्धीने वागत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे,' असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे.

संजय राऊत यांनीही केलं भाष्य

'शरद पवार एक मोठे नेते आहे याआधी सुद्धा शरद पवार यांच्यावर हल्ला झाला होता. एका माथेफिरूने तो केला होता. त्यातच अशी सुरक्षा काढून टाकून काय साध्य करायला पाहिजे हे दिल्लीत बसलेल्या त्यांच्या गुरुवर्यना कळायला हवं. आता राज्यात सरकार स्थपन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे यामागे काय कुटनीती आहे हे बघावं लागेल,' असं संजय राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 02:58 PM IST

ताज्या बातम्या