'मी साहेबांसोबतच...', छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चांना दिलं उत्तर

'मी साहेबांसोबतच...', छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चांना दिलं उत्तर

विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होत आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे, 6 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत. यावेळी भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

'मी राष्ट्रवादीतच आहे. वावड्या उठवण्याचं काम माध्यमं करत आहेत. कोण सूत्र यांना काय सांगतोय, हे स्पष्ट करा म्हणावं. मी साहेबांसोबतच आहे आणि आज बैठकीला आलोय. आता बास इतकच,' असं म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा खोडून काढत फटकारलं आहे.

राष्ट्रवादीचे बाहुबली नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. छगन भुजबळ यांच्या प्रवेशावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं. स्थानिक कार्यकर्त्यांनी भुजबळांनी लवकरात लवकर शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी केली, तर नेते मात्र विरोधाचा सूर आळवत राहिले. मात्र आता छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ हेदेखील उपस्थित आहेत. भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा थांबण्याची शक्यता आहे.

भुजबळ येवल्यातूनच लढणार

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षात अर्थात शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा करण्यात आला. ही चर्चा सुरू असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मोठी घोषणा केली.

छगन भुजबळ गेल्या दोन दिवसांपासून येवला मतदारसंघात तळ ठोकून होते. यंदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदासंघातून लढतील, असं बोललं जात होतं. अशातच आता छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत मी येवला मतदारसंघातूनच लढणार असल्याची मोठी घोषणा केली. भुजबळांच्या या घोषणेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO: 'औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं 5 वर्षांत केलं', 'या' निर्णयावर भडकले अमोल कोल्हे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 01:59 PM IST

ताज्या बातम्या