राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या यादीत कुणाचा समावेश? अनिल देशमुख यांनी दिलं तिरकस उत्तर

राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या यादीत कुणाचा समावेश? अनिल देशमुख यांनी दिलं तिरकस उत्तर

राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित आहे, असंही अनिल देशमुख म्हणाले.

  • Share this:

जळगाव, 1 नोव्हेंबर : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत कोणाला स्थान मिळणार, याबाबत राज्यभरातून अंदाज व्यक्त केले जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 नाव ठरली आहेत. परंतु, ती गुपित आहेत ही नावे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्य वेळ आली की ती नावे आम्ही जाहीर करू,' अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

'विधान परिषदेवर 12 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित आहे,' असंही अनिल देशमुख म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी अनिल देशमुख अमळनेर आले होते. या कार्यक्रमाआधी पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजीमंत्री डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, चिमणराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ उपस्थित होते.

भाजपमध्ये गदारोळ उडाल्याचा देशमुख यांचा दावा

'माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे,' असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

खडसे यांच्या पक्षांतरामुळे भाजप अडचणीत आली असून त्यामुळेच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार आहे, अशी आवई उठवली जात आहे. आपल्या पक्षाची पडझड रोखण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावला.

Published by: Akshay Shitole
First published: November 1, 2020, 5:34 PM IST

ताज्या बातम्या