Home /News /maharashtra /

राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बातमी, राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत एकाच गाडीने खडसेंचा प्रवास!

राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बातमी, राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत एकाच गाडीने खडसेंचा प्रवास!

जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले आहेत.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 17 ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले आहेत. रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख एकनाथ खडसे यांची भेट झाली असून या भेटीबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विश्राम गृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीने घटनास्थळी निघाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर बोरखेडा शिवारातील चार अल्पवयीन बालकांची हत्येची  घटना शुक्रवारी घडली होती. या चारही मुलांवर रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या ठिकाणी कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख हे एकत्र पोहोचले आहे. विशेष म्हणजे, एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी खडसेंचा याचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. पण, आता एकनाथ खडसे यांनीच राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चेवर 'नो कमेंट' अशी प्रतिक्रिया देऊन गुगली टाकली आहे. 'मला सध्या याबद्दल काहीही बोलायचे नाही. योग्य वेळी उत्तर देईल', असंही एकनाथ खडसे म्हणाले. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादीतील प्रवेश हा लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत निर्णयानंतरच पक्षांतराचा मुहूर्त  ठरू शकतो अशी शक्यता त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करत आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'चर्चाही केवळ चर्चा असते. त्याचा काहीही अर्थ नसतो.  एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत' असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या