हॉटेल, लॉज सुरू झाले...मंदिरांचं काय? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं उत्तर

हॉटेल, लॉज सुरू झाले...मंदिरांचं काय? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं उत्तर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

  • Share this:

जालना, 31 ऑगस्ट : राज्यातील देवस्थाने उघडावीत या मागणीसाठी भाजपकडून रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात आलं. तर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील पंढरपुरातील विठ्ठलाचं मुखदर्शन घेत मंदिर खुलं करावं, अशी मागणी केली. याच मुद्द्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

'आता परत लॉकडाऊनचा विषय राहिला नसून परिस्थितीचा अभ्यास करून टप्प्या-टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबविणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याअगोदरच स्पष्ट केलं आहे. राज्यातील देवस्थान,शाळा,कॉलेज,मंदिर यासर्व गोष्टी अनलॉक करण्याचा अधिकार राज्यप्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असून ते योग्य तेच निर्णय घेतील,' अशा शब्दात राजेश टोपे यांनी विरोधकांना टोला लगावला.

अनलॉकमध्ये देऊळबंदच, काय आहे सरकारचा निर्णय?

राज्य सरकारनं राज्यातील जिल्हा बंदी उठवून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारनं ई पासची अटही रद्द केली आहे. मात्र मंदिरे खुली करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं गेल्या दोन दिवसांपूर्वी 'दार उघड उद्धवा दार उघड' हे आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात पंढरपुरात विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी तर थेट विठ्ठल मंदिरात प्रवेश करून मुखदर्शन घेतलं. त्यामुळे अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात मंदिर खुली करण्याची राज्य सरकार परवानगी देईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे विरोधकांना आता राज्य सरकारवर टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2020, 10:29 PM IST

ताज्या बातम्या