...म्हणून आता महाराष्ट्रात अजित पवार ठरणार 'किंगमेकर'

...म्हणून आता महाराष्ट्रात अजित पवार ठरणार 'किंगमेकर'

दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवलेली शिवसेना सत्तेच्या खेळात आता आघाडीवर असलेली पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभरात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. सत्ता स्थापनेतून माघार घेत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवलेली शिवसेना सत्तेच्या खेळात आता आघाडीवर असलेली पाहायला मिळत आहे. तसंच या राजकीय पेचात राष्ट्रवादीचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिवसेनेचं लक्ष आता माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्या निर्णयाकडे असणार आहे. कारण राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केलेलं पत्र अजित पवार यांच्याकडे सोपवलं आहे. राष्ट्रवादीचे गटनेते ज्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशा आशयाच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सत्तेसाठी एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याचे सर्वाधिकार राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडे दिल्याने अजित पवार यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीत दुरावा निर्माण झाला असताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशातच आमदारांनी सह्या केलेलं पत्र सोपवल्याने अजित पवार राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

भाजपला आता 'ते' आमदारही देणार धक्का?

भाजपने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवल्याने या नाट्यात ट्विस्ट निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सत्तेची नवी समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्तेपासून दूर चाललेल्या भाजपला आणखी एक धक्का बसू शकतो.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून मोठा संघर्ष निर्माण झाला. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला. मात्र सर्वाधिक जागा असल्याने सुरुवातीला भाजप सत्तास्पर्धेत पुढे होता. त्यामुळे मग निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी भाजपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकत्रित म्हणजे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह आघाडीतील दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सुरू केल्याची माहिती आहे.

सर्वसाधारणपणे अपक्ष आमदार सत्तेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतात. आता राज्यात सत्तेचं समीकरणच बदलत असल्याने आधी पाठिंबा दिलेले आमदारही भाजपला धक्का देत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करणार नसल्याने आता अपक्ष आमदार भाजपची साथ सोडून इतर पक्षात जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

SPCIAL REPORT: अवकाळी पावसानं बळीराजाला रडवलं; 2 हजार हेक्टरवरील पिकं भुईसपाट

Published by: Akshay Shitole
First published: November 10, 2019, 11:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या