नवं सरकार स्थापन झाल्यावर भेटीत फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? अजित पवार म्हणाले...

नवं सरकार स्थापन झाल्यावर भेटीत फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? अजित पवार म्हणाले...

राजकीय नाट्यानंतर नुकतीच एका लग्नसोहळ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीबद्दल अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव, 9 डिसेंबर, बारामती : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याच्या जोरावर भाजपचं सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र नंतर अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आणि भाजप सरकार कोसळलं. या सर्व राजकीय नाट्यानंतर नुकतीच एका लग्नसोहळ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीबद्दल अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी मांडली होती. त्यामुळे सहज चर्चा झाली. हे पहा आम्ही राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच या भेटीत काय चर्चा झाली यावर उत्तर देताना अजित पवार यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. 'त्याठिकाणी आम्ही पाऊस-पाण्याविषयी बोललो', असं अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्रिपदाबाबतही भाष्य

राज्यात नवं सरकार स्थापन होऊन दोन आठवडे पूर्ण होत आले तरीही मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अद्यापपर्यंत करण्यात आलेलं नाही. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आता अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. 'मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो अधिकार त्यांचा आहे. कार्यकर्त्यांना वाटते मला उपमुख्यमंत्री करावं, पण याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. ज्या लोकांनी मला एक लाख 65 हजार मताधिक्‍याने निवडून दिलं त्यांची काम मला करायचे आहेत.

क्लीन चिटबद्दल बोलणं टाळलं

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. नियमानुसार, कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळं अजित पवार यांना कोणत्याही गैरव्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलं. मात्र या क्लीन चिटबद्दल प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 12:03 PM IST

ताज्या बातम्या