परळी आणि मुंब्र्यातील भावा-बहिणीच्या संघर्षावरून अजित पवारांची तुफान फटकेबाजी

राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालेल्या अजित पवार यांनी मोठा हशा पिकवला.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 10:23 PM IST

परळी आणि मुंब्र्यातील भावा-बहिणीच्या संघर्षावरून अजित पवारांची तुफान फटकेबाजी

मुंबई, 30 ऑक्टोबर : 'सगळीकडेच भावा-बहिणीची गंमतच चालली आहे. आमच्या बारामतीतच बरं चाललंय म्हणून चांगलं आहे. नाहीतर परळीमध्ये काय अन् मुंब्र्यात काय, काय विचारताच सोय नाही. मागं जसं काका-पुतण्यात जोरात चालायचं, तसं आता भावा-बहिणीत सुरू झालं आहे. गमतीचा भाग सोडा पण नुकतीच भाऊबीज झाली. सगळ्या बहिणींना माझ्या शुभेच्छा,' अशी मिश्किल टिपण्णी करत नुकतेच राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालेल्या अजित पवार यांनी मोठा हशा पिकवला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा काही मतदारसंघात भाऊ विरूद्ध बहीण असा संघर्ष रंगल्याचं दिसलं. परळीतील राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या लढतीने तर राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच जितेंद्र आव्हाड यांना भाऊ मानणाऱ्या दिपाली सय्यद आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. या लढतींवरच मिश्किल भाष्य करत अजित पवार यांनी नेत्यांची फिरकी घेतली.

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी पाठिंबा दिला.

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षेनेतेपदासाठी अनेक नावं चर्चेत होती. यामध्ये जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळांसह अन्य काही नेत्यांची नावेही चर्चेत होती. मात्र अखेर अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Loading...

'जनतेचे प्रश्न मांडू'

विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात अजित पवार यांनी निवडणूक निकालांवर भाष्य केलं आहे. तसंच आगामी काळातील दिशाही स्पष्ट केली आहे. लवकरच पराभूत उमेदवारांशी चर्चा करणार आहे. निवडणुकीआधी कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत होते, त्यामुळे जिवाभावाचे सहकारी सोडून गेले. पण मी सांगत होतो अंडर करंट आहे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, आलेला निकाल मान्य करून भविष्यात जनतेचे प्रश्न मांडू,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा नरमाईचा सूर; नेमकं काय म्हणाले राऊत? UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 10:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...