विवेक कुलकर्णी, मुंबई 19 जून : राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांना सत्ताधारी बाकांवरून दाद मिळाली ती एकनाथ खडसे यांची खडसे हे भाजपमध्ये नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे अनेकदा ते आपली खदखद आपल्याच मंत्र्यांना कोंडीत पकडून व्यक्त करतात. त्यामुळे विरोधी पक्षांचे नेते मुद्दाम खडसेंचं कौतुक करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचीही चांगलीच फिरकी घेत टीका केली.
अजित पवार म्हणाले, समस्यांचा डोंगर फोडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष नेत्यालाच फोडले. विखे यांनी त्यांच्या बंगल्यावर Thugs of Maharashtra असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले होते. मग ते लगेच ठगांच्या टोळीत कसे सामील झाले.
राधाकृष्ण विखे पाटीलांनी मुख्यमंत्री कार्यालयावर ५ हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आणि आता त्यांच्या पक्षात प्रवेश केला. मग त्यांची कोणती खरी भूमिका कोणती ? त्यावर खडसे म्हणाले को राधाकृष्ण विखे सभागृहात नाहीत. त्यांच्यावर टिप्पणी किंवा आरोप करू नयेत. ते असतांना आरोप करावेत आणि उत्तरं घ्यावी. आरोप रेकॉर्ड वरून काढून टाकावे अशी विनंती खडसे यांनी केली.
जयदत्त क्षीरसागर यांचा अजित पवारांना टोला लगावला. मला मंत्रिपद मिळालं ही आपलीच मेहेरबानी. तुम्ही कोंडी केली म्हणून मी मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडलो. गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे स्वत:ला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजतात, हेच सांगत होते की मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे म्हणून असा टोलाही त्यांनी लगावला.
गणिताच्या पुस्तकात झालेल्या बदलांवरूनही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री फडणवीसांना काय फडण दोन -झीरो म्हणायचं का? असा सवाल त्यांनी केला. मुलांचं नुकसान होईल असे निर्णय घेऊ नका असंही त्यांनी सरकारला सुनावलं.