मुंबई, 15 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकत्रित विमान प्रवास केला आहे. मुंबई-नागपूर अशा एकत्रित प्रवास हिवाळी अधिवेशनासाठी हे दोन्ही नेते नागपुरात एकत्र दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.
विमान प्रवासापूर्वी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये विमानतळावर जवळपास पाऊण तास गप्पा रंगल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हेदेखील उपस्थित होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज 'सामना' दैनिकात 'भाजपच्या आशा अजित पवारांवरच' असं म्हटलं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्रित विमान प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फडणवीस मारणार एका दगडात दोन पक्षी? विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरेश धस यांच्या नावाची चर्चा
विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांत सरकार स्थापनेबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. यातच अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत थेट भाजपला पाठिंबा देऊन टाकला. या पाठिंब्याच्या जोरावरच नव्या सरकारची स्थापना होऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र नंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने हे सरकार कोसळलं. त्यामुळे आता अजित पवार यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसोबत विमान प्रवास केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.
'भाजपच्या सर्व आशा आजही फक्त अजित पवारांवरच टिकून'
'सरकार नागपुरात पोहोचले आहे. मुंबईत येऊन संपूर्ण मंत्रिमंडळ बनेल व नंतर पाच वर्षे टिकेल,' असा विश्वास आज 'सामना' दैनिकातून संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसंच यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या भूमिकेविषयीही भाष्य केलं आहे. 'उद्धव ठाकरे व श्री. शरद पवार यांच्याकडे ही दिलदारी मला पहिल्या दिवसापासून दिसत आहे. अडवणुकीचे व ओरबाडण्याचे धोरण दिसत नाही हे महत्त्वाचे. सगळय़ात मोठे प्रश्नचिन्ह आहे ते अजित पवारांच्या भूमिकेविषयी. 80 तासांचे सरकार ज्यांनी फडणवीस यांच्याबरोबर स्थापन केले ते अजित पवार काय करतील? भाजपच्या सर्व आशा आजही फक्त अजित पवारांवरच टिकून आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अजित पवारांच्या भूमिकेविषयी मी शरद पवार यांना विचारले. अजित पवारांचे काय? पवार विश्वासाने म्हणाले, ‘‘अजित पवारांची चिंता करू नका. हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील. निश्चिंत राहा!’’ शरद पवार निश्चिंत आहेत तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. हे सरकार टिकवायचेच या एका निर्धाराने शरद पवार उभे आहेत. काळजी नसावी,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.