'मुख्यमंत्री आणि उद्धवजींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला'

'मुख्यमंत्री आणि उद्धवजींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला'

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजप-शिवसेनेला खोचक टोमणा मारला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जेपी नड्ड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेसुद्धा उपस्थित होते. या उदयनराजेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या मेगाभरतीची खिल्ली उडवली आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादीच्या जितक्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला तो पाहता दोन्ही पक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला असं अप्रत्यक्षपणे आव्हाड यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, तिथं नव्यांची संख्याच जास्त दिसायला लागली आहे. याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी ट्विटरवरून खोचक टोमणा मारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते अचानक झंम्प्या तिथे कुतुहलाने बघायला गेला तिथे उदयनराजे भोसले,भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला, मुख्यमंत्री आणि उध्दवजीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून.

दरम्यान, उदयनराजेंच्या राष्ट्रवादीला रामराम करून भाजप प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. सोशल मीडियावर पोस्ट करून आव्हाड यांनी पवारांनाच विचारलं की, साहेब उदयनराजें वर तुम्ही मानापासून प्रेम केले, साताऱ्यातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलंत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत. पोटच्या पोरासारखं प्रेम केलंत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही साहेब काय मिळाले? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला.

दरम्यान, भाजप प्रवेशावेळी उदयनराजे म्हणाले की, 'देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करत आहेत. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपचं काम सुरू आहे. लोकसेवा करण्यासाठी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला', असे सांगत उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत भाजपप्रवेश केला.

उदयनराजेंनी गुरुवारी (12 सप्टेंबर)शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतचं राहणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केला होता. मात्र या भेटीनंतर अवघ्या काही तासातचं उदयनराजेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. उदयनराजे भलेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी अनेक वेळा त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेऊन पक्षाची कोंडी केली होती. शरद पवार वगळता इतर नेत्यांना त्यांनी फारसं महत्त्व दिलं नाही.

SPECIAL REPORT: राजे मंडळींनी राष्ट्रवादीची साथ सोडली; शरद पवार एकटे पडले?

Published by: Suraj Yadav
First published: September 14, 2019, 12:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading