बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो ! राष्ट्रवादीने ‘या’ दांपत्याला दिली बंटी-बबलीची उपमा
बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो ! राष्ट्रवादीने ‘या’ दांपत्याला दिली बंटी-बबलीची उपमा
राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा-कौर यांना टोमणा लगावला आहे. बायको जात चोरते, तर नवरा राजदंड पळवतो असं म्हणत हे दोघं बंटी-बबली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
मुंबई, 7 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra Assembly) पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) गाजले ते गदारोळ, घोषणाबाजी, हमरीतुमरी आणि आमदारांचे निलंबन यामुळे. अधिवेशनादरम्यान आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. जागेवरून उठून तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा-कौर (Navneet Rana Kaur)यांना टोमणा लगावला आहे. बायको जात चोरते, तर नवरा राजदंड पळवतो असं म्हणत हे दोघं बंटी-बबली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे.
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले#अधिवेशन
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 7, 2021
गोंधळाचे अधिवेशन
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन गाजले ते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारा इम्पिरिकल डेटा केंद्राने द्यावा, याबाबतच्या ठरावावेळी अभूतपूर्व गोंधळ झाला. विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासमोरील माईकही ओढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. त्यानंतर 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय तालिका अध्यक्षांनी जाहीर केला होता. याच काळात रवी राणा यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तालिका अध्यक्षांनी मार्शल बोलावून त्यांना सभागृहातून बाहेर काढले होते. या मुद्द्यावरून आता जोरदार टीकेला सुरुवात झाली आहे.
हे वाचा -काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश
पती-पत्नी टार्गेट
अधिवेशनात राजदंड पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार रवी राणांवर तर टीका होतच आहे. मात्र काही दिवसांपूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांनाही राष्ट्रवादीनं लक्ष्य केलंय. कौर यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी त्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अधिवेशन संपूनही आऱोप-प्रत्यारोप मात्र संपताना दिसत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.