'तेरी जगह कोई पुरुष होता, तो उसको नहीं छोड़ता' राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची सेनेच्या महिला नगराध्यक्षांना धमकी

'तेरी जगह कोई पुरुष होता, तो उसको नहीं छोड़ता' राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची सेनेच्या महिला नगराध्यक्षांना धमकी

चक्क सभागृहातच शिवसेनेच्या नगराध्यक्ष परवीन शेख यांना अशी धमकी दिली गेल्याने सभागृहातच एकच गोंधळ उडाला.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली, 18 डिसेंबर : "तेरेको भेजा है क्या! तेरी जगह कोई पुरुष होता तो उसको नही छोडता, लेकिन तुझे भी देख लूंगा" अशी धमकी चक्क सभागृहातच शिवसेनेच्या नगराध्यक्षांना देण्यात आली. सेनेच्या परवीन शेख यांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने अशी धमकी भर सभागृहात दिल्याने शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला आहे.

दापोली शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केल्यानंतर दापोली नगरपंचायतीने  विशेष सभा बोलावली होती.  या  विशेष सभेत दापोली शहरातील अनधिकृत टपऱ्याच्या मालकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र, शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याने, आम्ही पर्यायी जागेचा विषय निकाली काढू असं सत्ताधारी नगरसेवकांनी सांगितलं. त्यानंतर, तुम्हाला जर विषय निकाली काढायचा होता तर आम्हाला कशासाठी बोलावलं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी नगरसेवक खालिद रखंगे यांनी विचारला.

तसंच सत्ताधारी पक्ष आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आणि मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही  खालीद रखंगे यांनी केला. दरम्यान,आक्रमक झालेले खालिद रखंगे यांनी महिला नगराध्यक्षांबद्दल अर्वाच्य भाषा वापरत "तेरेको भेजा है क्या ! तेरे जगा कोई पुरुष होता तो उसको नही छोडता, लेखिन तुझे भी देख लुंगा" अशी धमकीच दिली.

रखंगेंच्या या विधानामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेचे सर्व नगरसेवकही नगराध्यक्षांच्या मदतीसाठी सरसावले. सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे, काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणानंतर शिवसेनेचे गटनेते प्रकाश साळवी यांनी नगराध्यक्ष परविन शेख यांची बाजू घेत विरोधकांवर जोरदार पटलवार केला.  तसंच हा विषय आपण पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे घेऊन जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मात्र, दापोली नगराध्यक्षांना भर सभागृहात धमकी प्रकरण विरोधी नगरसेवक खालिद यांना चांगलेच भोवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या