'सातारा विजया'नंतर दौरा रद्द का केला? स्वत: शरद पवारांनी केला खुलासा

'सातारा विजया'नंतर दौरा रद्द का केला? स्वत: शरद पवारांनी केला खुलासा

सातारा दौरा रद्द का केला, याबाबत आता शरद पवारांनी खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर साताऱ्यात जाऊन मी श्रीनिवास पाटील यांचं अभिनंदन करणार आहे, तसंच सातारकरांचे आभार मानणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. मात्र नंतर श्रीनिवास पाटील हेच शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीला गेले. त्यामुळे सातारा दौरा रद्द का केला, याबाबत आता शरद पवारांनी खुलासा केला आहे.

'मैत्रीपुढे ज्यांनी कशाचीच फिकिर केली नाही असे माझे सवंगडी आणि आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये सत्कार करताना खूप समाधान वाटले. यानिमित्ताने आमच्या मैत्रीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा कार्यक्रम खरं तर साताऱ्यातच करण्याचे योजले होते, परंतु तेथील राजकीय परिस्थितीमुळे श्रीनिवास बारामतीत आले आणि हा हृद्य सोहळा संपन्न झाला,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली. यावेळी निवडणुकीमध्ये झालेल्या सभांची चर्चा याबद्दल याठिकाणी दोन्ही मित्रांचा गप्पांचा फडदेखील चांगलाच रंगला. दोन्ही मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना या उजाळा दिला.

साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील जाएंट किलर ठरले आहेत. उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता पाहता त्यांचा पराभव कठीण मानला जात होता. मात्र उदयनराजेंचा पक्षांतराचा निर्णय लोकांना पसंत पडला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं आहे.

VIDEO : उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

First published: October 26, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading