मुंबई, 9 जानेवारी : मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पहिल्यांदाच पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी मंत्र्यांना सरकारच्या कारभाराबाबत कानमंत्र दिला. तसंच पक्षाच्या संघटन वाढीसाठी काय करता येईल, याबाबतच्या सूचनाही दिल्या.
'एखाद्या प्रकरणात कारवाई करताना त्याची नीट माहिती घ्या. दोन-चार अधिकाऱ्यांवर अवलंबून राहू नका,' असं म्हणत फ्री काश्मीरच्या मुद्द्यावरून करण्यात आलेल्या कारवाईवरून शरद पवार यांनी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. फ्री काश्मीर म्हणजे आझाद काश्मीरची भूमिका नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
'भाजपच्या काळातील चुका टाळा'
'भाजपच्या कार्यकाळात जे प्रकार सुरू होते ते आपल्या कार्यकाळात होता कामा नयेत. अशा प्रकारांमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे ते टाळायला हवेत', अशा सूचना मंत्र्यांना करत शरद पवार यांनी भाजपलाही उपरोधिक टोला लगावला आहे.
जिल्हा परिषदांवर कुणी मारली बाजी? ग्रामीण भागात भाजपसाठी धोक्याची घंटा बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
'मंत्री, राज्यमंत्र्यांनी कसं काम केलं पाहिजे? मंत्रालयात किती दिवस हजर रहायचे? मतदारसंघात कधी जायचे? पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात कसे काम करावे? याबाबत मार्गदर्शन केलं,' अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. 'काम करताना पक्षाला कमीपणा येईल असं होऊ नये. लोकाभिमुख काम झालं पाहिजे. तीनही पक्षात समन्वय राहिला पाहिजे. काम करताना सगळ्यांची कामं करा. काम करताना पक्ष नव्हे राज्य आणि सर्व सामान्य लोक डोळ्यासमोर ठेवा,' अशा सूचनाही राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्र्यांना देण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.