'ही माझी जबाबदारी आहे...नाही तर असे सरकार काय कामाचे?' शरद पवारांनी दिला शब्द

'ही माझी जबाबदारी आहे...नाही तर असे सरकार काय कामाचे?' शरद पवारांनी दिला शब्द

कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेली एक मागणी शरद पवारांनी मान्य करत त्याबाबत तेथील जनतेला आश्वासन दिलं आहे.

  • Share this:

पुणे, 8 फेब्रुवारी : आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या विष्णुपंत जोग महाराज यांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेली एक मागणी शरद पवारांनी मान्य करत त्याबाबत तेथील जनतेला आश्वासन दिलं आहे.

'आज याठिकाणी इंद्रायणी शुद्धीकरणाची मागणी आली आहे. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमात काय म्हणाले शरद पवार?

"आज इथे आळंदीत आलोय तो काही हेतू ठेवून आलेलो नाही. मी सगळ्या ठिकाणी जात असतो. पण माझा हेतू याचे प्रदर्शन करणे हा नसतो. काहींचा समज आहे की राजकारण्यांना केवळ प्रसिद्धी हवी असते. मात्र या गैरसमजाच्या रस्त्याला मी गेलेलो नाही.

आळंदी तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्यासंबंधी उल्लेख या ठिकाणी केला. या सगळ्या परिसराचा विकास करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि सुदैवाने मला जनतेने राज्य करण्याचा अधिकार दिला. याचा उपयोग समाजासाठी करायचा असतो असे संस्कार माझ्यावर आहेत. तुमचे जसे गुरू आहेत तसेच श्रद्धास्थान माझे देखील आहे. त्यांचे नाव यशवंतराव चव्हाण. चव्हाणसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की जी संधी आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली त्यांचा विसर कधी पडू देऊ नका. त्या रस्त्याने मी जात आहे.

लहानपणी वारी आल्यावर शाळेतून वारकऱ्यांसाठी शिधा आणायला सांगायचे. तो शिधा वारकऱ्यांना देण्यात येई. पण शिधा घेणारे कमी असल्याने त्यांना आग्रह करावा लागत असे. पुढे लोकांमध्ये काम करताना एक ठरले की ज्यांचे सद्विचार ऐकले त्या मंडळींचा जीर्णोद्धार करावा आणि ते आम्ही केलं.

या वारकरी परंपरेचा समन्वय ज्ञानेश्वर महाराजांनी साधला. तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयाला आली. तेव्हापासून आजवरच्या काळात देशाने अनेक हल्ले पाहिले. पण त्यात वारकरी परंपरेला कोणतीच शक्ती हलवू शकली नाही. त्याचे कारण परंपरेत असलेली बांधिलकी. याचा उल्लेख बहिणाबाईंनी केला आहे. पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि कळस संत तुकारामांनी घातला. या संतविचारधारेद्वारे सर्व समाजाची उंची कशी वाढेल याचे स्वरूप वारकरी शिक्षण संस्थेने दिले.

शेगावात अनेक सुविधा झाल्या, निवासाची उत्तम सोय केली, शिक्षणाची सोय केली. हे सगळं वारकऱ्यांच्या कष्टातून त्यांच्या मेहनतीतून झालं. तिथले प्रांगण स्वच्छ ठेवण्यासाठी सेवेकऱ्यांनी येऊन सेवा करावी हा प्रकार आहे. पण याची मला गंमत वाटते की सेवेकरी म्हणून मला संधी मिळण्यासाठी सहा महिने वाट बघावी लागते. अशी सेवा आणि सेवेबद्दल बांधिलकी आजवर मी कुठे पाहिलेली नाही ते आज इथे पाहायला मिळते.

आज याठिकाणी इंद्रायणी शुद्धीकरणाची मागणी आली आहे. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे.

एकदा काशीला गेलो असताना तिथल्या घाटात अर्धवट जळालेली प्रेत पाहिली. देशातील कानाकोपऱ्यांतून जनता तिथे श्रद्धेपोटी येते. देशाच्या पंतप्रधानांनी तो घाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला, याचा मला आनंद आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. हे तिथे घडलं असेल ते इथे घडून आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे."

First published: February 8, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading