सत्ता स्थापनेचा प्रश्न लांबणीवर, शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक पुढे ढकलली

जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होणार नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत बोलणं होणार नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी चांगलाच वेळ लागणार असल्याचं चित्र आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात रविवारी बैठक होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण त्यांच्यात आज कोणतीही बैठक होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्याचं दिसत आहे. जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होणार नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत बोलणं होणार नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी चांगलाच वेळ लागणार असल्याचं चित्र आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी म्हटलं होतं की, फक्त काँग्रेस काही ठरवू शकत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर पुढची वाटचाल ठरेल. यावर रविवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण आता ही बैठक लांबणीवर गेली आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यातील तीन पक्षाची एकत्र बैठक झाली. यामध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. त्यानंतर आता तीन पक्षातील वरिष्ठ नेते एकत्र मिळून चर्चा करतील. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं म्हटलं होतं. तसेच महाशिवआघाडीचं सरकार येईल आणि ते 5 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल असं ही मह्टलं होतं.

इतर बातम्या - 'मी_भाजपा_सोडतोय' हॅशटॅगने ट्विटरवर घातला धुमाकूळ

मंत्रिपदाबाबत शिवसेनेनं 16- 14- 12 च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच 14-14-14 अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समजत आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षांसाठी असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

इतर बातम्या - आगे आगे देखिए होता है क्या, संजय राऊतांच्या 'त्या' ट्ववीटला काँग्रेसचं उत्तर!

First published: November 17, 2019, 7:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading