राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा Why I Killed Gandhi हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटावरुन त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई, 20 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा Why I Killed Gandhi हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण हा प्रोमोच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण या चित्रपटात अमोल कोल्हे हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच 'मी गांधीजींचा वध केला', असं वक्तव्य अमोल कोल्हे चित्रपटाच्या प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया देताना रोखठोक भूमिका मांडली आहे. अमोल कोल्हे यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासी संलग्न अशीच हवी, असं मत अंकुश काकडे यांनी मांडलं आहे.
अंकुश काकडे नेमकं काय म्हणाले?
"अमोल कोल्हे यांचं स्टेटमेंट तुम्ही वाचून दाखवलं. ते कलाकार म्हणून त्यांना ते पटत असलं तरी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करताना आपली काही जबाबदारी असते. कलाकार हा राजकीय, धार्मिक, सामाजिक या सगळ्यांपेक्षा वरचढ असतो हे मान्य केलं तरी ज्यावेळेला आपण एखादा पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करतो त्यावेळेला आपली जबाबदारी असते. त्या पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत अशीच आपली वागणूक असली पाहिजे", अशी प्रतिक्रिया अंकुश काकडे यांनी दिली.
'हे कोणत्याही भारतीयासाठी योग्य नाही'
"अमोल कोल्हे यांनी आज किती जरी सांगितलं तरी ते आज एका पक्षात खासदार म्हणून काम करतात. अशावेळी त्यांची ही भूमिका योग्य नाही. त्यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न अशीच असावी. अर्थात त्यांनी वैयक्तिरित्या काय करणं हा त्यांचा प्रश्न आहे. तरी महात्मा गांधींचा ज्याने खून केला त्याची भूमिका करणं हे कोणत्याही भारतीयासाठी योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार म्हणून काम करणाऱ्या माणसाला तसा अधिकार निश्चित नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी माझी योग्य ती भूमिका त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवेल. त्यांना तो चित्रपट प्रदर्शित हऊ नये, अशी विनंती करेन", असं देखील अंकुश काकडे यांनी सांगितलं.
अमोल कोल्हे यांची नेमकी भूमिका काय?
"मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका: - 2017 साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.
(शाळा सुरू होणार; पण मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक)
कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!"
Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो बघा :काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांची प्रतिक्रिया
"अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका टाळायला हवी होती. ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला ती भूमिका कशाला करायची? गांधीजी किंवा नेहरुंची भूमिका करायची. इतकी हिंस्त्रक भूमिका कशाला करायची? ते चूक आहे. ती भूमिका साकारताना त्यांनी ती भूमिका किती छान केली ते पण दाखवावं लागेल. ते कलाकार आहेत हे मान्य आहे. पण ते एका पक्षाचे खासदार देखील आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची आयडोलॉजी घेऊन चालायला हवं", अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी दिली.
'विचारधारेपेक्षा सत्ता टिकवणं जास्त महत्त्वाचं', दरेकरांची खोचक टीका
"सर्वप्रथम कलाकृती आहे. कलाकाराने कोणती भूमिका साकारावी हा त्याचा सर्वस्वी निर्णय आहे. तरीही अमोल कोल्हे हे एका पक्षाचे खासदार आहेत. राजकारणात आहे. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते. पण हुसैन दलवाई यांच्या बोलण्यातून एक आगतिकता मला दिसतेय. इथे विचारधारेपेक्षा सत्ता टिकवणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते म्हणताय ते चूक आहे. कारण ती भूमिका निभावत असताना जीव ओतून काम करणार. त्या विचाराचा प्रसार करणारण्याचा प्रयत्न करणार. पण अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर करण्याची जास्त आवश्यकता आहे. कारण ही भूमिका ते जाहीर करतील, बोलतील. पण आता सगळ्या भूमिका गुंडाळून केवळ सत्ता टिकवण्याचं सर्वाचं अंतिम ध्येय आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा होतील. हुसैन दलवाईंसारखे चुकाही काढतील. पण ते या भूमिकेतून माघार घेतील, असं वाटत नाही", अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.