शिरूरचे आजी-माजी खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार? व्हायरल बातमीनंतर मतदारसंघात गोंधळ

शिरूरचे आजी-माजी खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार? व्हायरल बातमीनंतर मतदारसंघात गोंधळ

दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या नेतृत्वाबद्दल भाजप प्रवेशाची बातमी शेअर करून टीका करत असल्याने मतदारसंघात चांगलाच गोंधळ उडाला.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: आढळराव पाटील यांनी फेसबुवकर पोस्ट लिहीत खुलासा केला आहे. तसंच राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे.

दुसरीकडे, अमोल कोल्हे यांच्याही भाजप प्रवेशाबाबत वृत्तपत्रातील बातमीचा फोटो व्हायरल करून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. 'राष्ट्रवादीतील चार आमदारांनी अमोल कोल्हे यांना हैराण केल्याने ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.'

शिरूर मतदारसंघातील या दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या नेतृत्वाबद्दल भाजप प्रवेशाची बातमी शेअर करून टीका करत असल्याने मतदारसंघात चांगलाच गोंधळ उडाला.

शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे आमने-सामने

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे हे शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करत जायंट किलर ठरले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत राज्यात सत्तास्थापन केली. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांचे गणित बदलले आहे. नेमक्या याच कारणामुळे आढळराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची एक बातमी मतदारसंघात व्हायरल केली जात आहे. मात्र आता ही बातमी खोडून काढत आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे.

'ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाही अन त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा! करमणूक अनं कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसं होणार नाही. माझ्याविषयी खोटी माहिती पसरवून शिरूर लोकसभेतील जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही,' अशी फेसबुक पोस्ट लिहित आढळराव यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात व्हायरल होत असलेल्या बातमी शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर टीका केली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र आढळराव यांनी स्वत: एक ब्लॉग लिहित कंगनावर निशाणा साधला आहे. हा ब्लॉग त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केलेला आहे.

"कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना!" या शीर्षकाखाली लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आढळराव पाटील यांनी कंगनाच्या टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अफवांबद्दल अमोल कोल्हे यांनीही दिलं उत्तर

अमोल कोल्हे यांच्याबाबतची बातमी व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांनीही ट्वीट करत उत्तर दिलं आहे. “15 वर्षे “ मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पहायला मिळाली नव्हती! मन:पूर्वक आभार,' असा टोला अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला आहे.

शिरूरमधील या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 19, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या